सरकारी कामात अडथळा आणत नाशिकचे महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना शिवीगाळ करत हात उगारल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांच्यावर सरकारवाडा पोलीसांत गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आ. बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

नाशिक महापालिकेवर प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असताना आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या शिष्टमंडळासह महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांच्यात शाब्दिक वाद झाल्याने कडू यांचा संयम सुटल्याने ते आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अंगावर धावून गेले होते. यावेळी त्यांनी आयुक्तांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हात देखील उगारला होता. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी आयुक्त अभिषेक कृष्णा यांना संरक्षण देत आमदार बच्चू कडू यांच्यापासून दूर केले होते.

नाशिक महानगरपालिकेकडून अपंगांचा तीन टक्के राखीव निधी आजवर खर्च केला जात नाही तसेच १९९५ चा अपंग पुनर्वसन कायदा महानगरपालिकेने अंमलात आणला नसल्याचा आरोप करत प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली आज (दि.२४) महापालिकेच्या मुख्यालयासमोर दुपारी १२ वाजेपासून धरणे आंदोलन करण्यात आले होते.

कडू यांनी जेव्हा कृष्णा यांच्यावर हात उगारला तेव्हा तेथील पोलिस कर्मचाऱ्यांनी आयुक्तांना त्यांच्यापासून दूर नेत त्यांना संरक्षण दिले. दुसरीकडे कडू यांच्या शिष्टमंडळाच्या कार्यकर्त्यांनी कडू यांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेनंतर शरणपुररोड परिसरातील महापालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालयासमोर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

“आमदार बच्चू कडू यांनी मला शिवीगाळ करत अंगावर धावून येण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माझ्यावर हात देखील उचलण्याचा प्रयत्न केला. माझ्या संरक्षणासाठी याठिकाणी पोलीस कर्मचारी असल्याने त्यामुळे पुढे काही घडले नाही. याप्रकरणी आम्ही आ. बच्चू कडू यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत” असे यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी सांगितले.