25 February 2017

News Flash

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाजपकुमार थापाडे; राज ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

राज ठाकरेंची शिवसेना भाजपवर जोरदार टीका

लोकसत्ता ऑनलाइन | February 19, 2017 7:04 AM

मनसेप्रमुख राज ठाकरे

नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांची नाशिकमध्ये सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसह भाजप आणि शिवसेनेवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. भाजपला पर्यायी शब्द भाजप आहे आणि मुख्यमंत्री भाजपकुमार थापाडे आहेत, असे म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांसह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपसोबतच शिवसेनेलाही राज ठाकरेंनी लक्ष्य केले.

‘नाशिकमध्ये महापालिकेच्या माध्यमातून जे काम केले, ते मनापासून केले. निविदांच्या माध्यमातून पैसे खाण्याची मला सवय नाही. बाकीच्या पक्षांना फक्त शहरांना ओरबाडून पैसे खायचे आहेत. नाशिक महापालिकेत भ्रष्टाचार करु न दिल्याने अनेकांनी पक्ष सोडला. भाजपने त्यांच्यासमोर पैसे फेकले. त्यामुळे काही लोक भाजपमध्ये केले,’ अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी पक्ष सोडणाऱ्यांवर घणाघाती टीका केला.

‘नाशिक महापालिकेवर गेल्या पाच वर्षांमध्ये भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात असताना नाशिक महापालिकेला आयुक्त देण्यात आला नाही. मात्र तरीही नाशिक महापालिकेने चांगले काम केले आहे. एल एँड टी, जीवीके, टाटा, महिंद्रा यासारख्या कंपन्यांच्या सीआरएस फंडातून नाशिकमध्ये अनेक कामे झाली आहेत. शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाड्या उपलब्ध आहेत. या गाड्या नेमक्या कोणकोणत्या भागात त्यावर जीपीएसच्या माध्यमातून नजर ठेवली जाते. नाशिकमधील अनेक रस्त्यांच्या निविदा २०१३ मध्ये निघाल्या. त्यावेळी रस्त्यांची कामे झाली आणि तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप सरकारच्या माध्यमातून कामे झाल्याचे सांगतात,’ असे म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख भाजपकुमार थापाडे म्हणून केला.

‘शिवसेनेने २५ वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता असताना कोणती कामे केली, हे माझ्यासोबत एकाच व्यासपीठावरुन सांगावे,’ असे म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेला थेट आव्हान दिले. ‘शहर विकास हा माझ्यासाठी आवडीचा विषय आहे. तो राजकारणाचा आणि पैसे खाण्याचा विषय नाही. उज्जैनच्या कुंभमेळ्यात कमी भाविकांची उपस्थिती असूनही त्या ठिकाणी केंद्र सरकारने जास्त निधी दिला. मात्र भाविकांची संख्या जास्त असूनही नाशिकमधील कुंभमेळ्याला अतिशय तुंटपुजा निधी देण्यात आला. मात्र तरीही नाशिक महापालिकेने कुंभमेळ्याचे व्यवस्थित नियोजन केले. त्यामुळेच नाशिकच्या महापौरांचा अमेरिकेत सत्कार झाला,’ असे म्हणत राज ठाकरे यांनी नाशिकमधील विविध कामांची माहिती उपस्थितांना दिली.

 

First Published on February 17, 2017 8:09 pm

Web Title: mns chief raj thackeray speech nashik municipal corporation election