परस्परांविरोधात तक्रारी; गुन्हा दाखल

किरकोळ कारणावरून मनसेच्या पदाधिकाऱ्याने एका संगणक व्यावसायिकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीचा निषेध करत संगणक व्यावसायिकांनी सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण पोलिसांना सादर करत या पदाधिकाऱ्याविरुध्द कारवाईची मागणी केली. दरम्यान, या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

मनसेचा शहर सरचिटणीस सत्यम खंडाळे असे या संशयिताचे नाव आहे. अशोक स्तंभाजवळील संचेती कॉम्प्लेक्समध्ये अमित पवार यांचे संगणकाचे दुकान आहे. या इमारतीत संशयित खंडाळेने गणेशोत्सवाचे साहित्य आणि फलक ठेवले होते. दिवाळीतील साफ सफाईसाठी हे साहित्य पवार यांनी इतरत्र हलविले. त्याचा राग येऊन खंडाळेने गुरूवारी सकाळी वाद घालून त्यांना मारहाण केली. या प्रकरणी दोघांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात परस्परांविरुध्द तक्रारी दिल्या. त्यावरून दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी शहरातील संगणक व्यावसायिकांच्या नाशिक कॉम्प्युटर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध करत सरकारवाडा पोलीस ठाणे गाठले. ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हाचे परिसरातील सीसीटीव्ही चित्रण त्यांनी पोलीस यंत्रणेला सादर केले. त्यात खंडाळे तक्रारदाराला बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने पवार यांना मारहाण केल्याची तक्रार संघटनेने केली. सत्यम खंडाळे हे आमच्या संकुलाचे कोणतेही सदस्य नसल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. गणेशोत्सवात ठराविक रक्कमच वर्गणी म्हणून देण्यासंदर्भात त्याचा परिसरातील व्यापाऱ्यांवर दबाव येत असल्याची चर्चा आहे.