तारे-तारकांच्या नाशिक पर्यटनानंतर मनसेने सोमवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा श्रीगणेशा केला. मागील निवडणुकीत लेखी व तोंडी परीक्षा घेणाऱ्या मनसेने या वेळी पद्धत बदलली. इच्छुकांना निवड समितीच्या तोंडी परीक्षेला सामोरे जावे लागले.

इच्छुकांमध्ये पक्षीय पदाधिकाऱ्यांऐवजी आयारामांची संख्या अधिक आहे. पहिल्याच दिवशी महापौरांसह शहराध्यक्षांनी मुलाखतीचे सोपस्कार पार पाडताना प्रचाराला सुरुवात करण्याचा सल्ला दिला.

इतर राजकीय पक्षाच्या मुलाखती झाल्यानंतर पालिकेत सत्ताधारी राहिलेल्या मनसेच्या वतीने मुलाखतीला सुरुवात झाली.

मनसेने मित्रपक्षांच्या सहकार्याने महापालिकेवर पाच वर्षे सत्ता गाजविली. निवडणुकीच्या तोंडावर पक्षातून घाऊक पक्षांतर झाले. ही पडझड सुरू असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा सूत्रे हाती घेत पक्षाला उभारी देण्याची धडपड सुरू केली. मनसेने केलेल्या विकासकामांचे लोकार्पण दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर चित्रपट व नाटय़ क्षेत्रातील कलावंतांना नाशिकची सफर घडवून विकास कामांचे विपणन करण्यात आले. या घडामोडींचे प्रतिबिंब राजगड कार्यालयात झालेल्या मुलाखतीत उमटले. इच्छुकांमध्ये महिला व युवकांचे प्रमाण मोठे होते. ५५० हून अधिक अर्ज गेल्याने मुलाखतीचे दोन दिवस नियोजन करण्यात आले आहे. माजी आमदार बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, पक्ष सचिव प्रमोद पाटील, शहराध्यक्ष सुनील ढिकले यांचा समावेश असलेल्या निवड समितीने इच्छुकांची मुलाखत घेतली. किती वर्षांपासून राजकारणात आहात, याआधी निवडणूक लढविण्याचा अनुभव आहे का, कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविली, मनसेकडून तिकीट का हवे, पक्षांसाठी आजवर काय योगदान दिले, तुमच्या प्रभागाची भौगोलिक रचना काय, तेथील समस्या, लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर कोणत्या प्रकल्पांना प्राधान्य राहील आदी जाणून घेण्यात आले.

महापौर अशोक मुर्तडक यांनीही इच्छुक म्हणून समिती समोर मुलाखत दिली. महापौर म्हणून काम केले. मात्र आगामी निवडणुकीत का तिकीट द्यावे यावर त्यांनी पाच वर्षांत मनसेने केलेली कामे, विकास प्रकल्प याचा सविस्तर लेखाजोखा समिती समोर मांडला. मात्र त्याच वेळी पक्षांतर्गत विशिष्ट प्रभागासाठी असणारी इच्छुकांची संख्या आणि त्यामुळे येणारी नाराजी याकडे लक्ष वेधले. शहराध्यक्ष ढिकले हे देखील मुलाखतीला सामोरे गेले. अभ्यंकर यांनी पक्षाकडे इच्छुकांची गर्दी झाली असून उच्चशिक्षितांची संख्या अधिक असल्याचे सांगितले. सर्वच ठिकाणी प्रबळ उमेदवार देण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. मात्र कोणत्याही स्थितीत पक्ष सोडून गेलेल्यांना संधी देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ३० जानेवारीपर्यंत पहिली यादी जाहीर होईल, असे त्यांनी सांगितले.

गरज शिस्तीची

महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी मनसे पक्ष कार्यालयात मुलाखतीस हजेरी लावली. काही आपल्या चारचाकी, काही दुचाकी वाहनांवर आले. पक्ष कार्यालयाच्या बाहेरील तंबूत उमेदवारांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली तर बाजूला वाहने लावण्यासाठी व्यवस्था होती. मात्र उमेदवारांसह समर्थक व नातेवाईकांना वाहनतळाऐवजी इतरत्र वाहने लावली. काहींनी अस्ताव्यस्त गाडी लावत काढता पाय घेतल्याने वाहतूक शिस्तीची शिकवण इच्छुकांना देण्याची गरज असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त झाली.