जळगाव, धुळे जिल्हा परिसरांतून बनावट व आरोग्यास अपायकारक देशी दारूची वाहतूक करणारा आयशर टेम्पो शुक्रवारी पहाटे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मालेगाव चौफुलीवर सापळा लावून पकडला. टेम्पोत बारदानाचे थर रचून त्याखाली ही दारू लपवण्यात आली होती. बनावट देशी दारूचे पाच लाख ३६ हजार ९४९ किमतीचे २३६ बॉक्स सापडले. आयशर टेम्पो व इंडिका मोटारीसह एकूण साडेचौदा लाखांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी सहा जणांना अटक केली. गेल्या काही वर्षांतील अवैध दारूविरोधातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. मुख्य म्हणजे ही बनावट देशी दारू आरोग्याला घातक असल्याने ती छुप्या मार्गाने बाजारात येण्यापूर्वीच पकडण्यात यंत्रणेला यश मिळाले. ही बनावट दारू कोठे बनविली जाते, यामागे कोणाचा हात आहे, कोठे विक्रीस नेली जात होती या सर्व बाबींवर लवकरच प्रकाश पडेल, असा विश्वास नवले यांनी व्यक्त केला. बनावट देशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ठिकठिकाणी शोधमोहीम हाती घेतली. गुरुवारी रात्रभर पोलिसांचे पथक या कामगिरीवर होते. शुक्रवारी पहाटे मालेगाव चौफुलीवरून आयशर पारोळा येथून मनमाडमार्गे पुढे जात होता. पोलिसांनी टेम्पोला थांबवत आतमध्ये काय आहे, याची विचारणा केली. तेव्हा चालकाने रिकामे बारदान असल्याचे सांगितले. त्याच्या बोलण्याचा संशय आल्याने पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता बनावट दारूचे २३६ बॉक्स आढळून आले. कारवाईत सापडलेली टँगो पंच नावाची देशी दारू इगतपुरी तालुक्यातील गोंदे शिवारात तयार होते. या कारवाईनंतर पोलिसांनी कंपनीशी संपर्क साधला असता कंपनीतून तयार होणाऱ्या दारूच्या बाटल्या व बॉक्सची व्हॉट्स अॅप आणि मेलवरून तपासणी केली असता पकडलेल्या बाटल्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले. बनावट मद्य जळगाव, धुळे जिल्ह्य़ांतून आयशरमध्ये आणताना कोणाला संशय येऊ नये यासाठी बॉक्सच्या वरील भागात रिकाम्या बारदानांचे तीन थर लावण्यात आले होते. तसेच मद्याची वाहतूक करताना संशयितांनी सोबत इंडिका मोटारही ठेवली होती. या प्रकरणी पोलिसांनी भूषण राजेंद्र सुर्वे (२९, रा. धुळे), अभिजित मनोहर गोयंका (२१, धुळे), महेंद्र आत्माराम पाटील (२५, अमदर), आशिक खान निशरखान (२३, धुळे), सुनील गिरीधर चौधरी (४३, एरंडोल), प्रकाश जाधव (३०, एरंडोल) यांना अटक केली आहे. ही अवैध देशी दारू पारोळ्याहून मनमाडजवळ पोहोचवली जात असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. आयशर टेम्पो, इंडिका मोटार आणि बनावट मद्य असा एकूण १४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.