तीन जून रोजी माऊन्टन लघूपट महोत्सव
भन्नाट.. बेफाम.. तुफान.. याची प्रत्यक्ष अनुभूती देणारा अनोखा अशा बाफं माऊन्टन लघुपट महोत्सवाचे ३ जून रोजी दुपारी साडे चार वाजता वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता महोत्सवात दर्जेदार नऊ लघुपटाचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
महाकवी कालिदास कला मंदिरात हा महोत्सव होणार आहे. मागील वर्षी प्रमाणे यंदाही ‘द हिमालयन क्लब’ने बाफं माऊन्टन चित्रपट महोत्सवाचा मान नाशिकला दिला आहे. महोत्सवाची जबाबदारी वैनेतय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेकडे आहे. महोत्सवाचे वैशिष्ठय़े म्हणजे कॅनडात अल्बर्टा येथे खऱ्या खुऱ्या विविध साहसी खेळांवरच्या चित्रपटांचा महोत्सव दरवर्षी आयोजित केला जातो. खऱ्या साहसांवर आधारित लघुपटांच्या जगभरातून प्रवेशिका येतात. त्यातील सर्वोत्तम लघुपटांची या महोत्सवासाठी निवड केली जाते. तसेच हे लघुपट अन्य कोणत्याही सिनेमागृहात पहायला मिळत नाही. यामुळे साहस ज्यांच्या अंगात भिनले आहे, त्यांच्यासाठी हा महोत्सव म्हणजे एक मेजवानी ठरतो. साहस करायचे म्हणजे जीवाची जोखीम पत्कारायची. पण ते करताना काही झालेच तर ते स्विकारण्याची सहजता आपल्यात हवी हे सूत्र महोत्सव साहसवीरांमध्ये भिनवते.
यंदाच्या महोत्सवात शहरातील गल्ल्या, इमारती, वाहनतळाच्या भिंती, दरवाजे, घरांच्या गच्ची याकडे धावत जाऊन लयबध्द पध्दतीने पार करणारा पाकरेर अ‍ॅथलिट विल सुटन ‘होमफ्री’तून समोर येईल. पाणी सर्वाच्या जिव्हाळ्याचा विषय. पण वेगवान धारांमध्ये कयाक घेऊन पाणी कापणाऱ्या कयाकरचा संघर्ष स्टर्जेसच्या ‘रे डेल रियो’तून आपल्याला भेटतील. पर्वतारोहण ही आवड असणाऱ्या जॉन ग्लासबर्गचा ‘गोल्डन गेट’ हा १७ मिनिटांचा लघुपट खिळवून ठेवेल. ‘टड्र क्लाईम्बिग’ हा पर्वतारोहणातला लोकप्रिय प्रकार आहे. त्यात दुर अंतरावर रक्षात्मक खिळे प्राप्त करतानाचे एमिली हॅरिंग्टनचे साहस श्वास रोखून धरायले लावते. ‘द सर्च फॉर फ्रीडम’ हा ‘आऊटडोअर अ‍ॅडव्हेंचर’ मधील काही मातब्बरांना घेऊन बनवलेला ४४ मिनिटांचा लघुपट एक विशेष आवृत्ती म्हणून जॉन लाँग व लॉरा झिमन यांनी केला आहे. सायकलवर आधारीत ऑस्ट्रियाच्या हेराल्फ फिलीपच्या माऊन्टबाईक, आईसलॅन्डच्या व्ॉटनॅजोकुल ग्लेशियरवर चित्रीत एक लघुपट, रॅरी बोसिया दीर्घ पल्लाचे धावणे ‘अल्ट्रा मॅरेथॉन’मध्ये दिसणार असून ‘रिल रॉक’ने महोत्सवाचा समारोप होईल. चित्रपटाच्या प्रवेशिकेसाठी टकले बंधू सराफ (०२५३-२५९६६५४), साई स्पोर्टस (९४२२९४०२३४), देशपांडे ऑप्टी व्हयू (०२५३-२३१५८९८) येथे संपर्क साधावा. नाशिककरांनी महोत्सवास मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.