जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गातील मालमत्तांचे मूल्यांकन तातडीने करून त्याचा अहवाल आठवडाभरात सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. समृध्दी महामार्गासाठी खरेदी करावयाच्या जमिनींचे दर जाहीर करण्यात आले आहेत. स्थावर मालमत्ता तसेच इतर मिळकतींचे मूल्यांकन अद्याप झालेले नाही. यामुळे विचारणा करणाऱ्या शेतकऱ्यांना माहिती देणे अवघड ठरत आहे.

समृध्दी महामार्गाच्या भूसंपादनास काही गावांमधून कमालीचा विरोध होत असताना प्रशासनाने थेट जमीन खरेदी करण्यासाठी दर जाहीर केले. जिल्ह्यात अद्याप जमीन खरेदीला प्रत्यक्षात सुरूवात झाली नसली तरी सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील शेतकरी महसूल यंत्रणेशी या अनुषंगाने चर्चा करीत आहेत. प्रस्तावित मार्गातील मालमत्तांच्या मूल्यांकनाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. या पाश्र्वभूमीवर, गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. जिल्ह्यातून १०० किलोमीटरचा मार्ग जाणार आहे. त्यासाठी ४९ गावातील १२९० हेक्टर जमीन संपादीत करावयाची आहे. त्यात सुमारे ३ हजार शेतकरी बाधित होतील. शेतजमिनींसोबत फळझाडे, विहिरी, जलवाहिनी, कुपनलिका, पाण्याच्या टाक्या, शेड, गाळे, इमारती, शेततळे, बागा बाधीत होणार आहेत.

या मालमत्तांच्या मूल्यांकनाबाबत शेतकरी विचारणा करतात. मूल्यांकनाअभावी त्यांना माहिती देणे अवघड ठरते. यामुळे मालमत्तांच्या मूल्यांकनाचे काम तातडीने करून त्याचा अहवाल आठवडाभरात सादर करावा, असे सूचित करण्यात आले. पाच गावात संयुक्त मोजणीचे काम अद्याप झालेले नाही. ज्या गटांच्या संमती येतील, त्या गटांचे २४ तासांच्या आत मूल्यांकन करून उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्याचा अहवाल सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले.

बाधीत होणाऱ्या मालमत्ता

प्रस्तावित समृध्दी महामार्गात सिन्नर व इगतपुरी तालुक्यात झाडे १३५००, विहिरी ३१२, कुपनलिका ७५, जलवाहिनी ३३०, पाण्याच्या टाक्या ४०, शेड १५०, इमारत ३००, बागा ११३, शेततळे २८ यांचा समावेश आहे. फळझाडांचे मूल्यांकन कृषी विभागामार्फत करण्यात येणार आहे. तर इतर झाडांचे मूल्यांकन वन विभागामार्फत होईल. विहिरी, जलवाहिनीचे मूल्यांकन महाराष्ट्र जीवन विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. तसेच इमारत, गोठे, घरांचे मूल्यांकन बांधकाम विभागामार्फत  होणार आहे.