शहर स्वच्छता मोहिमेत एकाच दिवसात ३५२ टन कचरा संकलित

प्रचंड दरुगधीमुळे कोणी नाक दाबून मागे फिरतंय, तर कोणी निव्वळ छायाचित्र काढण्यासाठी धडपड करतंय.. सहकाऱ्यांकडे दुर्लक्ष करत काही नेते व अधिकारी खऱ्या अर्थाने कचरा संकलनात मग्न झाले, तर कोणी चक्क आधीच चकाचक असलेल्या ठिकाणी झाडू मारण्याचे कर्तव्य पार पाडत होते.. अशा प्रकारे शुक्रवारी राबविण्यात आलेल्या शहर विशेष स्वच्छता मोहिमेंतर्गत एकाच दिवसात तब्बल ३५२.५ टन कचरा संकलित करणे शक्य झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी २ ऑक्टोबपर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याची सुरुवात विशेष मोहिमेच्या माध्यमातून करण्यात आली. ३१ ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली. गेल्या काही दिवसांत शहरात डेंग्यू व स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. कचऱ्यामुळे वाढते डास हे त्याचे मुख्य कारण. आरोग्याच्या प्रश्नावर महापालिका सभेत गदारोळ झाला होता. ही बाब अडचणीची ठरू शकते हे लक्षात घेऊन सत्ताधारी भाजपने सर्वपक्षीयांच्या सोबतीने स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसले.

नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत शालिमार येथे या मोहिमेचा शुभारंभ झाला. या वेळी आ. बाळासाहेब सानप, आ. प्रा. देवयानी फरांदे व सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, विभागीय आयुक्त महेश झगडे, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. पालिका आयुक्त डॉ. अभिषेक कृष्णा आदी उपस्थित होते.

या वेळी काही राजकीय नेते व शासकीय अधिकाऱ्यांनी कचरा संकलन करीत मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याचे दर्शविले. त्याचे यथासांग छायचित्रणही करून घेतले. मग त्यांचे काम थांबले, असेही लक्षात आले. सहकारी अधिकारी शांत बसले असताना जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छतेच्या कामात झोकून दिले होते. काही नगरसेवक व पालिकेचे अधिकारी छायाचित्र काढून घेण्यापुरतेच मोहिमेत सहभागी झाले.

पालकमंत्र्यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. त्यांच्या हस्ते शहर स्वच्छतादूत असलेल्या कविता राऊत, चित्रकार सावंत बंधू, प्रसाद पवार आणि अशोक दुधारे यांचा सत्कार करण्यात आला. स्वाइन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरिया अशा आजारांपासून शहर मुक्त करण्यासाठी नागरिकांनी परिसराची स्वच्छता राखावी आणि वर्षभर कर्तव्यभावनेने स्वच्छता उपक्रम राबवावेत, असे आवाहन महाजन यांनी केले.

शहरात वेगवेगळ्या भागांत निश्चित करण्यात आलेल्या जागांवर स्थानिक नगरसेविका, शालेय विद्यार्थी, सामाजिक व स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, पालिका कर्मचारी आदींच्या सहभागातून मोहीम राबविली गेली. काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसाठी अशी जागा निवडल्या की तिथे फारसा कचरा नव्हता.

नासर्डी नदीवरील उंटवाडी पुलाखाली मोठय़ा प्रमाणात कचरा साचलेला आहे. काही पालिका कर्मचारी पुलालगतच्या भागातून खाली उतरले. तेथील दरुगधीमुळे अवघ्या काही मिनिटांत स्वच्छता न करताच नाक दाबून ते माघारी फिरले. स्वच्छता दृष्टिपथास पडेल, अशा विशिष्ट चौकात स्वच्छता करण्यास प्राधान्य दिले. चौकालगतच्या रस्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे पाहावयास मिळाले. उघडय़ावर कचरा टाकू नये म्हणून जनजागृतीही करण्यात आली.

पालकमंत्र्यांचा पुढाकार

पालकमंत्र्यांनी शुभारंभापासून ११ वाजेपर्यंत विविध ठिकाणी स्वच्छतेसाठी श्रमदान केले. संत गाडगे महाराज पुतळ्यापासून परतत असताना त्यांना दुभाजकाच्या मध्यावर कचरा आढळला. त्यांनी वाहनांचा ताफा तिथेच थांबविला. एक तास इतर स्वयंसेवकांसह श्रमदान केले. त्याच चौकात असणाऱ्या जुन्या कारंजात उतरूनही महाजन यांनी स्वयंसेवकांच्या सहकार्याने तेथील कचरा काढला. या परिसरातून एक घंटागाडी भरून कचरा काढण्यात आला. रस्त्यात कचरा दिसेल त्या ठिकाणी थांबून त्यांनी त्या परिसराची स्वच्छता केली. नागरिकांचे प्रबोधनही केले. सिडकोतील पेलिकन पार्क येथे भेट देत स्वच्छता कामांची पाहणी केली. पार्कचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा आणि यापुढे त्या ठिकाणी कचरा होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.