गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी लोकसहभाग वाढविण्याचे आश्वासन राजकीय पदाधिकाऱ्यांनी देत नदीच्या विशिष्ट भागाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे तर दुसरीकडे महाविद्यालयीन युवकांनी या कामात सक्रिय योगदान देण्याचे मान्य केले. नमामी गोदा फाऊंडेशनच्या पुढाकारातून गोदा माई सन्मान महाअभियानांतर्गत त्र्यंबकेश्वरहून काढण्यात आलेल्या वारीचे सोमवारी शहरात विविध महाविद्यालयांत स्वागत झाले.

जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभियानाचे उद्घाटन झाल्यानंतर रविवार व सोमवार या दिवशी त्र्यंबकेश्वर ते नाशिक अशी दोन टप्प्यांत वारी काढण्यात आली. अभिनेता चिन्मय उदगिरकर, अभिनेत्री धनश्री क्षीरसागर, राजेश पंडित यांच्या नेतृत्वाखालील वारीला सोमवारी सोमेश्वर येथून सुरुवात झाली.

शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी या संदर्भात गोदावरीला प्रदूषणाच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी लोकसहभाग वाढविण्याचे मान्य केले. नदीच्या संरक्षणासाठी विशिष्ट भागाची जबाबदारी स्वीकारण्याची त्यांनी तयारी दाखविली. उपरोक्त कामात फाऊंडेशन संबंधितांना तांत्रिक साहाय्य करणार आहे. भोसला सैनिकी महाविद्यालयात गोदावरीच्या पाण्याचा कलश घेऊन दाखल झालेल्या वारीचे लष्करी शैलीत स्वागत झाले. विद्यार्थ्यांनी संचलन करत वारकऱ्यांना सलामी दिली. महाविद्यालयीन विद्यार्थी स्वच्छतेच्या कामात योगदान देण्यास तयार आहेत. फाऊंडेशनने युवा वर्गाची शक्ती कशी व कुठे वापरता येईल, याचे नियोजन करावे, असे सांगण्यात आले.

एनबीटी विधि महाविद्यालय, बीवायके महाविद्यालयात वारीचे जल्लोषात स्वागत झाले. वारीतील मंडळींशी चर्चा झाल्यावर विद्यार्थी वारीला निरोप देण्यासाठी प्रवेशद्वारापर्यंत आले. गोदावरी प्रदूषणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये चांगली जनजागृती झाली आहे. त्यांना प्रत्यक्ष काम करण्याची मनीषा असल्याचे पंडित यांनी सांगितले.

वारीदरम्यान ग्लोबल व्हिजन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाटय़ाद्वारे गोदावरी कशी प्रदूषित होत आहे आणि जागरूक नागरिक म्हणून आपण ते कसे थांबवू शकतो, यावर प्रकाश टाकला. त्यास उपस्थितांनी दाद दिली. पथनाटय़ाचे नेपथ्य व दिग्दर्शन रोहित पगारे यांनी केले. अश्विनी कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, गोदा प्रदूषण मुक्तीसाठी पर्यावरणप्रेमी समविचारी संघटनांनी एकत्र येत नमामी गोदा फाऊंडेशनची निर्मिती केली आहे. या उपक्रमाद्वारे त्र्यंबकेश्वरपासून राजमुंद्रीपर्यंत संपूर्ण गोदावरी खोरे प्रदूषण मुक्त करण्याचा मानस आहे. वारीत जनस्थान, प्रयास फाऊंडेशन, संवर्धन सेवाभावी संस्था, मानव उत्थान मंच आदी समविचारी संघटना सहभागी झाल्या आहेत.