नाशिकमधील वयोवृद्ध सायकलपटूने एक नवा विक्रमच प्रस्थापित केलाय. उतार वयात आपल्यातील धमक दाखवत ६१ वर्षीय दीपक शिर्के यांनी सायकलवरुन अमरनाथ यात्रा पूर्ण केली. त्यांच्या या जिद्दी प्रवासाची नाशिकमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. निवृत्त बँकर असलेल्या शिर्के त्यांनी ४००० किमीचे हे अंतर सायकलने पूर्ण करत नव्या दमाच्या सायकलपटूंसमोर एक आदर्श ठेवला आहे.  १३ जून रोजी संकष्टी चतुर्थीला काळारामाचे दर्शन घेऊन ते या यात्रेसाठी रवाना झाले. इंदूर, ओमकारेश्वर, शिवपूर, ग्वाल्हेर, आग्रा, दिल्ली, जम्मू या मार्गाने प्रवास करत त्यांनी अमरनाथ गाठले. त्यानंतर परतीचा प्रवास अमृतसरमार्गे करत व्हाया गंगानगर, बिकानेर, जयपूर, अहमदाबाद, बडोदा, सापुतारा या मार्गाने ते बुधवारी नाशिकमध्ये पोहोचले.

रोज सरासरी ७० ते ८० किमीचा प्रवास करत शिर्के १० जुलैला जम्मू येथे पोहचले. आठवडाभर ते जम्मू काश्मीरमध्ये होते. काश्मीर खोऱ्यातील तणावपूर्ण वातावरणात त्यांनी हिमतीने सायकल प्रवास केला. सायकल प्रवासाबद्दल शिर्के म्हणाले की, हा संपूर्ण प्रवास अविस्मरणीय होता. प्रवासात असताना मित्र, सहकारी, नाशिक सायकलिस्टचे सदस्य आणि आता आपल्यात नसलेले जसपाल सिंगजी हे देखील सतत संपर्कात होते. प्रवासादरम्यान कोणत्याही हॉटेलमध्ये न थांबता त्यांनी मंदिर, गुरुद्वारा, ढाबा अशा ठिकाणी मुक्काम केला. या संपूर्ण यात्रेसाठी साधारण २० ते २५ हजार रुपये इतका खर्च आला. यापूर्वी अनेक सायकल मोहिमेत सहभागी झालेल्या शिर्के यांनी हिमालयात अनेकवेळा सायकलिंग केले. मात्र ही यात्रा विशेष होती, असे त्यांनी सांगितले.

शिर्के यांनी यापूर्वी सुमारे १००० किमी अंतराची अष्टविनायक फेरी, विविध शक्तीपीठे आणि ११ दिवसांत १२ ज्योतिर्लिंग असा प्रवास केला आहे. तसेच ईशान्य भारताची सात राज्ये सायकलवर ते यापूर्वी फिरले आहेत. यासाठी ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसने त्यांची दखलही घेतली होती. या मोहिमेनंतर शिर्के दक्षिण दिग्विजय मोहिमेला जाणार आहेत. यात ते नाशिक ते रामेश्वरम असा प्रवास करणार आहेत.