घोटी शहरातील बाजार समिती मागील वसाहतीत आज, शनिवारी सकाळी घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात दोन जण जखमी झाले आहेत. गॅस गळतीमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

चंद्रप्रकाश सूर्यबली चौहान हे वसाहतीतील दगडू सोनवणे यांच्या चाळीत कुटुंबीयांसह राहतात. आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास चौहान यांना कामावर जायचे होते. त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन गॅस सुरू केला. यावेळी गॅसगळती होऊन गॅस संपूर्ण घरात पसरला. त्यामुळे सिलिंडरने पेट घेतला. घाबरलेल्या चौहान यांनी आरडाओरडा सुरू केला. त्यांनी पत्नी आणि मुलांना घराबाहेर जाण्यास सांगितले. त्याचवेळी पेट घेतलेल्या सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटाने संपूर्ण घर हादरले. स्वयंपाक घरातील किचन ओटा, खिडक्या, दरवाजा आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेत चौहान भाजले आहेत. दरम्यान, कुटुंबाचा आरडाओरडा ऐकून त्यांच्या मदतीसाठी धावून आलेले घरमालक अजय सोनवणे हेही भाजले आहेत. या घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, उपनिरीक्षक संदीप शिंदे, प्रीतम लोखंडे यांच्यासह गॅस वितरक जयप्रकाश नागरे, प्रशांत जाधव आदींनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, त्याची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

गॅसगळती झाल्याचा अंदाज

चंद्रप्रकाश चौहान यांनी गॅस सुरू करताच त्यातून गॅस बाहेर पडू लागला. तो सर्व घरात पसरला. त्यानंतर काही कळायच्या आतच सिलिंडरने पेट घेतला. त्यावेळी चौहान सुरुवातीला घाबरले. त्यांनी आरडाओरड़ा सुरू केला. घरात असलेल्या पत्नी आणि मुलांना त्यांनी बाहेर पडण्यास सांगितले. त्यांनी प्रसंगावधान राखून आपल्या पत्नी आणि मुलांना बाहेर पडण्यास सांगितल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, गॅसगळतीमुळे सिलिंडरचा स्फोट झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.