चलन तुटवडा कमी होणार

चलन तुटवडय़ामुळे अडचणीत सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पडून असलेल्या ३४२ कोटींच्या जुन्या नोटा रिझव्‍‌र्ह बँकेकडे जमा करण्याचा मार्ग खुला झाल्यामुळे या बँकेची दैनंदिन चलनवलनाची घसरलेली गाडी पुन्हा एकदा रुळावर येण्यास मदत होणार आहे. तथापि, मागील सहा महिन्यांपासून पडून असलेल्या जुन्या नोटांसाठी बँकेला आजवर साडेआठ ते नऊ कोटींचे व्याज द्यावे लागले. नोटाबंदीच्या काळात जुन्या नोटा रिझव्‍‌र्ह बँकेने न स्वीकारल्याने हा नाहक भरुदड बँकेच्या माथी पडल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

गेल्या वर्षी नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर प्रारंभीचे काही दिवस जिल्हा बँकेला जुन्या नोटा स्वीकारण्यास परवानगी होती. नंतर अकस्मात ती रद्द करत देशातील जिल्हा बँकांकडे जमा झालेल्या नोटा स्वीकारण्यास रिझव्‍‌र्ह बँकेने नकार दिला. तेव्हापासून शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा बँकांवर अरिष्ट कोसळले. नाशिक जिल्हा बँक त्यास अपवाद ठरली नाही. उलट या बँकेची अवस्था इतकी बिकट झाली की, दैनंदिन व्यवहारासाठी पैसे राहिले नव्हते. कर्जमाफीची चर्चा सुरू असल्याने थकीत कर्जाची रक्कम भरण्यास कोणी तयार नव्हते. सहा महिन्यांत शेतकरी, शिक्षक, महावितरण, खासगी शैक्षणिक संस्था या सर्वाच्या रोषाला बँकेला तोंड द्यावे लागले.

पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी बँकेच्या मुख्यालयास टाळे ठोकले. शिक्षकांनी वारंवार आंदोलने करूनही बँक वेतनाचे पैसे देऊ शकले नाही. वीज देयकांपोटी संकलित केलेली रक्कम न दिल्याने महावितरण कंपनीने तर जिल्हा बँकेच्या विरोधात थेट गुन्हा दाखल केला. ज्येष्ठ व गरजू खातेदारांना स्वत:च्या खात्यातील पैसे काढण्यासाठी अक्षरश: तिष्ठत बसावे लागले. या एकंदर स्थितीत शिक्षकांचे वेतन खाते अन्य बँकांमध्ये वर्ग करण्याचा निर्णय झाला. बँकेने दैनंदिन चलनवलनासाठी राज्य बँकेकडील ठेवींची रक्कम मिळविण्यासाठी आटापिटा केला, परंतु बँकेची आर्थिक संकटातून आजतागायत सुटका झालेली नाही.

या पाश्र्वभूमीवर अर्थ मंत्रालयाने रिझव्‍‌र्ह बँकेला जिल्हा बँकांकडील जुन्या नोटा स्वीकारण्याचे निर्देश दिल्याने जिल्हा बँकेचा जीव भांडय़ात पडला आहे. नोटाबंदीच्या काळात जिल्हा बँकेच्या माध्यमातून काहींनी काळा पैसा बदलून घेतल्याची चर्चा होती. त्या वेळी बँकेकडे एकूण ३४२ कोटींच्या जुन्या नोटा जमा झाल्या. या रकमेबाबतच्या व्यवहारांची सरकारी यंत्रणांमार्फत तपासणी करण्यात आली. काही रकमेचा तपशील देण्यास बँक असमर्थ ठरल्याची वदंता होती. परंतु त्यात तथ्य आढळले असते तर बँकेविरोधात कारवाई झाली असती, परंतु तसेही पुढील काळात घडले नाही. खातेदारांनी जमा केलेल्या ३४२ कोटींच्या जुन्या नोटांवर बँकेला चार टक्के दराने व्याज द्यावे लागते. मार्च २०१७ पर्यंत जुन्या नोटांसाठी बँकेला ५ कोटी ८३ लाख रुपये मोजावे लागले. पुढील तीन महिन्यांचा विचार करता ही रक्कम साडेआठ ते नऊ कोटींच्या घरात जाईल.

प्रारंभी नोटा न स्वीकारल्याने जिल्हा बँकेवर हा नाहक भरुदड पडल्याचे बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी मान्य केले. जुन्या नोटा स्वीकारल्याने जिल्हा बँकेचे व्यवहार सुरळीत होण्यास मदत होईल. दैनंदिन चलनवलनात सुधारणा होईल. जुन्या नोटा बदलून मिळाल्यावर त्या रकमेचा पीक कर्ज देण्यास फारसा उपयोग होणार नसल्याचे दराडे यांनी नमूद केले.