जिल्हा शासकीय रुग्णालयातील नवजात अर्भकांच्या मृत्यूचा विषय गाजत असतांना गेल्या काही महिन्यांपासुन रुग्णालयाच्या प्रसुती विभागात ‘बाळ जन्माचे प्रमाण’ वाढले आहे. महिन्याकाठी ५०० ते ६०० बाळ जन्माचे प्रमाण असल्याचे सांगितले जाते. जिल्ह्यतील प्राथमिक रुग्णालये, उपरुग्णालये, ग्रामीण रुग्णालये इतकेच नव्हे तर खासगी रुग्णालयांकडूनही गरोदर मातांना प्रसुतीसाठी जिल्हा रुग्णालयाचा पर्याय देण्यात येत आहे.

गोरखपूर प्रकरणानंतर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील नवजात शिशु कक्षातील अपुऱ्या व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असतांना त्याच्या वेगवेगळ्या बाजू समोर येत आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात मागील सहा ते सात महिन्यात प्रसुती विभागातील बा़ळ जन्माचे प्रमाण लक्षणिय वाढले आहे.

कायाकल्प पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयाचा बदललेला चेहरा सर्वाच्या पसंतीस उतरला. स्वच्छता, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा तसेच विविध शासकीय योजनांची होणारी अंमलबजावणी यामुळे रुग्ण या ठिकाणी दाखल होऊ लागले. आदिवासी व ग्रामीण भागात आशा अंगणवाडी सेविका आपले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी गरोदर मातांना रुग्णालयात प्रसुती करण्यासाठी प्रबोधन करत आहे.

बऱ्याचदा वंशाला दिवा हवा म्हणून शहरातील काही डॉक्टरांकडे विशेष उपचाराद्वारे मुलगा होईल अशी हमी देत रुग्णांची फसवणूक केली जाते. यासाठी गर्भलिंग निदान करत मुलगी असल्यास गर्भपातही केले जात होते.

डॉ. लहाडे प्रकरणानंतर गर्भलिंग निदान कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाल्याने त्या प्रकारांना चाप बसला. विशेष उपचार सुरू असले तरी प्रत्यक्ष प्रसुतीच्या वेळी अशा काही गरोदर मातांना ऐनवेळी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे जेणेकरून मुलगी झाली तर नातेवाईकांचा उद्रेकाला थेट सामोरे जावे लागणार नाही. प्रसुतीसाठी विशिष्ट पदवी अपेक्षित असतांना बीएचएमएसधारकांकडून प्रसुती केली जात होती. ग्रामीण व शहरी भागात हे प्रकार थांबल्याने अनेकांनी जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतल्याचे चित्र आहे.

१०८ रुग्णावाहिकाही सेवेसाठी तत्पर

रुग्णांना जवळचे प्राथमिक रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालयाचा आधार असूनही तेथे अत्यावश्यक भूलतज्ज्ञ, बाळासाठी नवजात कक्ष या सुविधा नसल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविले जाते.  शहर परिसरातून ऐनवेळी शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली तर त्यासाठी ५० ते ६० हजार रुपये मोजावे लागतात. या शिवाय बाळाला जन्मत काही त्रास झाला तर व्हेंटीलेटरसह अन्य औषधांचा खर्च वेगळा. याची कल्पना खासगी रुग्णालयांनी दिल्यावर अनेक जण जिल्हा रुग्णालयात प्रसुती होण्यास पसंती देत आहे. काही ठिकाणी सरकारी रुग्णालयात काम करणारे डॉक्टर आपले रुग्ण सरकारी रुग्णालयात ओळखीने दाखल करून घेतात. प्रसुतीनंतर १०८ रुग्णवाहिकेने नवजात बाळ व माता यांना घरी पोहोचविले जाते. या सर्व कारणांमुळे गेल्या काही महिन्यात जिल्ह्य रुग्णालयात बालजन्माचे प्रमाण वाढले आहे. महिन्याकाठी रुग्णालयात ५००-६०० बाळांचा जन्म होत असतांना ही व्यवस्था अपुऱ्या मनुष्यबळावर चालविली जात आहे.

प्रसुती कक्षात आणखी तीन डॉक्टरांची नियुक्ती

जिल्हा रुग्णालयाकडून गुणवत्तापूर्ण सेवा दिली जात असल्याने रुग्ण आमच्याकडे येत आहेत. मात्र यामुळे कामाचा भार वाढला असून एका डॉक्टरला दिवसाकाठी ४ ते ५ प्रसुती कराव्या लागतात. त्यात काही महिलांचे सिझरही होते. यामुळे नव्याने ३ डॉक्टरांची नेमणूक करावी, अशी आमची मागणी आरोग्य विभागाने मंजूर केली आहे.

डॉ. सुरेश जगदाळे  (जिल्हा शल्य चिकित्सक)