उपचारासाठी केवळ १८ इनक्युबेटर; जिल्हा रुग्णालयातील वास्तवाने आमदारही हैराण

जिल्हा शासकीय रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षात दररोज ५० हून अधिक बालके उपचारासाठी दाखल होत असताना येथे केवळ १८ ‘इनक्युबेटर’ आहेत. परिणामी, अर्भक मृत्यूचे प्रमाण लक्षणीय वाढले.

पुरेशा इनक्युबेटरअभावी नवजात बालकांच्या मृत्यूत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, आ. जाधव यांनी पक्षाच्या शिष्टमंडळासमवेत गुरुवारी जिल्हा रुग्णालयाची पाहणी करत नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात अधिकची १८ इनक्युबेटर प्रणालीची तातडीने व्यवस्था करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. उत्तर प्रदेशातील गोरखपूरच्या शासकीय रुग्णालयातील अर्भक मृत्यूचे प्रकरण ताजे असताना नाशिक जिल्हा रुग्णालयातील इनक्युबेटरमध्ये क्षमतेहून अधिक नवजात बालकांवर उपचार करावा लागत असल्याने ऑगस्ट २०१७ या एका महिन्यात ५५ नवजात बालके दगावल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच समोर आला.

या गंभीर प्रश्नावर आ. जाधव यांनी जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश जगदाळे यांच्याशी चर्चा केली. या घटनेची आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना माहिती देऊन मुख्यमंत्र्यांना मागणीचे निवेदनही पाठविले. उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथील रुग्णालयात अर्भक मृत्यूची घटना ताजी असताना पुरोगामी महाराष्ट्रात पुढारलेल्या नाशिक जिल्ह्य़ात इनक्युबेटरच्या व्यवस्थेअभावी महिनाभरात ५५ बालकांचा मृत्यू होतो ही प्रशासकीय यंत्रणा व सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारी बाब असल्याचे जाधव यांनी सांगितले.

रुग्णालय प्रशासनाने कितीही चांगले काम केले तरी त्यांना भौतिक सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. उपचारासाठी नवजात अतिदक्षता विभाग सज्ज असतो. मात्र मोठय़ा संख्येने दाखल होणाऱ्या बालकांना उपचार देणे हे स्थानिक यंत्रणेपुढे आव्हान ठरत आहे. गंभीर परिस्थितीत नवजात बालकांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेले ‘व्हेंटिलेटर’चा एकही संच संपूर्ण राज्यातील एकाही जिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसणे ही धक्कादायक बाब असून त्याची गंभीरपणे दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली.

बालकांना संसर्गाची शक्यता

रुग्णालयातील स्थितीबाबत आ. जाधव यांनी मुख्यमंत्र्यांनाही निवेदन पाठविले आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील इनक्युबेटरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक नवजात बालकांवर उपचार करावा लागत आहे. या ठिकाणी केवळ १८ इनक्युबेटर प्रणाली आहेत. प्रत्यक्षात येथे दररोज पन्नासहून अधिक बालके उपचारासाठी दाखल असतात. नवजात बालकांना एकमेकांपासून संसर्गाचा अधिक धोका असतानाही अर्भकाच्या जिवाशी खेळून एका इनक्युबेटरमध्ये चार-चार बालके ठेवली जात आहे. जन्मत: कावीळ असलेली, श्वसनक्रियेला त्रास होत असलेली तसेच कमी वजनाच्या बालकांना इनक्युबेटरमध्ये ठेवणे आवश्यक असते. एका इनक्युबेटरमध्ये एकच बाळ ठेवणे बंधनकारक आहे, परंतु येथे अत्यवस्थ नवजात अर्भकांची संख्या अधिक असल्याने क्षमतेपेक्षा अधिक बालकांना ठेवले जाते. कमीअधिक प्रमाणात सर्व शासकीय रुग्णालयामधील हीच स्थिती असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

ऑगस्टमध्ये ३४६ पैकी ५५ अर्भकांचा मृत्यू

जिल्हा रुग्णालयात ऑगस्टमध्ये ३४६ बालके दाखल झाली होती, त्यापैकी ५५ अर्भकांचा मृत्यू झाला. एप्रिल २०१७ पासून या कक्षात दगावलेल्या बालकांची संख्या १८७ आहे. देशात एक महिन्याच्या आतील अर्भकांचा मृत्यूदर हजारमागे ४० हून कमी असताना नाशिक जिल्हा रुग्णालयात हे प्रमाण दीडशेहून अधिक असल्याची धक्कादायक बाब आ. जयंत जाधव यांनी मांडली.