प्रभाग क्रमांक २ ‘क’

शहरी व ग्रामीण भागाचा बाज लाभलेल्या ‘प्रभाग दोन क’मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले उद्धव निमसे आणि प्रदीर्घ काळ शेकापचे अस्तित्व टिकवून ठेवणारे पण आता शिवसेनेच्या तिकीटावर मैदानात उतरलेले अ‍ॅड. जयराम शिंदे या आजी-माजी नगरसेवकांमधील लढत चांगलीच चुरशीची ठरणार आहे. दोन्ही उमेदवारांकडे पालिकेच्या कामकाजाचा अनुभव आहे. शिवाय आपापल्या कार्यकाळात केलेल्या कामांची यादी देखील आहे. आता मतदार कोणाला पसंती देतात, याकडे सर्वाचे लक्ष आहे.

या प्रभागात आडगाव मळे परिसर, ग्रामीण पोलीस वसाहत, आडगाव गावठाण परिसर, कोणार्कनगर, अमृतधाम, विडी कामगार वसाहत, नांदूर-मानूर मळे परिसराचा अंतर्भाव आहे. शहरातील इतर कोणत्याही भागापेक्षा सर्वाधिक वेगाने विकसित होणारा हा प्रभाग आहे. महापालिकेत अ‍ॅड. जे. टी. शिंदे यांनी शेतकरी कामगार पक्षाचे अस्तित्व कायम ठेवले होते. दुसरीकडे उद्धव निमसे हे काँग्रेसचे प्रदीर्घ काळ नगरसेवक राहिले. बदलती राजकीय समीकरणे लक्षात घेऊन हे दोघे नवीन पक्षाचा झेंडा हाती घेऊन मैदानात उतरले आहेत. मूळ आडगावचे असणारे अ‍ॅड. शिंदे हे शेकापच्या तिकीटावर १९९२-९७, १९९७-०२ आणि २००७-१२ असे तीन वेळा निवडून आले.

२००२ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून ते पराभूत झाले. १५ वर्षांच्या कार्यकाळात आडगावचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी थेट जलवाहिनी व जलकुंभाची उभारणी, प्रभागातील प्रमुख व कॉलनीसह मळ्यापर्यंतच्या रस्त्यांचे डांबरीकरण, आडगाव हद्दीत ट्रक टर्मिनसची उभारणी अशी विविध कामे केल्याचा दाखला ते देतात. प्रभागात राखलेला जनसंपर्क आणि केलेली विकास कामे यावर त्यांची भिस्त आहे.

शिंदे यांची लढत आहे सलग दोन वेळा काँग्रेसचे नगरसेवक राहिलेले आणि सध्या भाजपच्या तिकीटावर मैदानात उतरलेल्या उद्धव निमसे यांच्याशी. नांदूर-मानूर हे त्यांचे मूळ गाव. या परिसरात त्यांचा मोठा गोतावळा आहे. सलग दहा वर्ष या परिसराचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या निमसे यांनी स्थायी समितीचे सभापतीपदी काम केले. निलगिरी बाग येथे घरकूल योजनेचे काम पूर्णत्वास नेले. नव्याने विकसित होणाऱ्या कॉलनी परिसरात मूलभूत सुविधांची निगडीत कामे मार्गी लावली. विकास कामे आणि जनसंपर्क यावर निमसे यांची मदार आहे. आधीच्या प्रभागात पुनर्रचनेमुळे मोठे फेरबदल झाले. प्रभागाचे क्षेत्र कमालीचे विस्तारले. त्यात आडगाव आणि नांदूर-मानूर हे भाग समाविष्ट झाले. हे दोन्ही उमेदवार त्यातील एकेका भागातील आहेत. या व्यतिरिक्त मनसेचे अनंत सूर्यवंशी व दोन अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. निमसे-शिंदे या आजी-माजी नगरसेवकांमध्ये चुरशीची होईल. त्यामुळे पक्षांतराचा लाभ नेमका कोणाच्या पथ्यावर पडणार हे निकालातून समोर येईल.