शिवसेना, राष्ट्रवादीचे आव्हान

लक्षवेधी लढत प्रभाग क्रमांक २ ‘क’

प्रदीर्घ काळ नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व करताना आमदार झालेले भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांचा मुलगा मच्छिंद्र, अलीकडच्या काळापर्यंत सानप यांचे खंदे समर्थक मानले जाणारे शिवसेनेचे उमेदवार विलास आव्हाड आणि राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक समाधान जाधव यांच्यात ‘प्रभाग क्रमांक ३ अ’मध्ये होणारी लढत चांगलीच चुरशीची ठरली आहे. स्वत:चा प्रभाग व मतदारसंघातील ही निवडणूक सानप यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. भाजपसमोर सेना व राष्ट्रवादीचे आव्हान आहे. या तिरंगी लढतीत नेमके कोण बाजी मारणार याकडे सर्वाचे लक्ष आहे.

रासबिहारी शाळेमागील परिसर, कमलनगर, लाटेनगर, हिरावाडी रोड, विजयनगर, गणेशवाडी, आयुर्वेद महाविद्यालय, केवडीबन, दंत महाविद्यालय परिसर, चव्हाण मळा आदी विस्तीर्ण भागाचा या प्रभागात समावेश होतो. पुनर्रचनेत नवीन भाग जोडला गेला. यामुळे विद्यमान नगरसेवकासह सर्व उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान आहे. जुन्या प्रभागात सानप यांचे प्रदीर्घ काळ वर्चस्व राहिले. महापौरपदाच्या काळात त्यांनी प्रभागात बरीचशी विकास कामे मार्गी लावली. नगरसेवक असताना ते थेट विधानसभेत पोहोचले. यामुळे रिक्त झालेली जागा निकटवर्तीयाला दिली जाईल, अशी सर्वाची अटकळ होती. सानप यांचे समर्थक आव्हाड यांच्यासह इतरांनी तशी अपेक्षाही व्यक्त केली. त्या अनुषंगाने संबंधितांनी तिकीट मागितले. परंतु, ते नाकारले गेल्याने आव्हाड यांच्यासह नाराज गटाने शिवसेनेचा रस्ता पकडून उमेदवारी मिळविली. या जागेवर सानप यांनी मुलगा मच्छिंद्रला रिंगणात उतरविले आहे. कोरी पाटी असणाऱ्या मच्छिंद्रची भिस्त वडिलांनी केलेली विकास कामे व जनसंपर्कावर आहे. निवडणूक मुलगा लढवत असला तरी प्रचाराचे नियोजन वडिलच करत आहे. मुलासह प्रभागातील भाजपच्या चारही उमेदवारांची जबाबदारी आ. सानप यांच्यावर आहे.

मच्छिंद्र सानप याची लढत आहे ती, शिवसेनेचे आव्हाड आणि राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक जाधव यांच्याशी. सानप यांचे कट्टर समर्थक राहिलेले आव्हाड यांची जनसंपर्कावर मदार आहे. भाजपने तिकीटातून डावलल्याची सहानभूती पॅनलच्या पथ्यावर पडेल, अशी सेनेची अपेक्षा आहे. सानप व आव्हाड हे दोन्ही वंजारी समाजाचे आहेत. प्रभागात या समाजाच्या मतदारांची संख्या लक्षणीय नसली तरी दोघांच्या उमेदवारीमुळे मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. नेता-समर्थक यांच्यातील भांडणात लाभ घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे.

राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांनी पक्षांतर केले असले तरी जाधव हे पक्षातच राहिले. मागील पंचवार्षिकमध्ये केलेली विकास कामे आणि सर्वसामान्यांमध्ये असलेला वावर यावर त्यांची भिस्त राहील. परंतु, याच प्रभागात अन्य जागेवर गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे सहकारी उमेदवार आहेत. त्यामुळे या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार, याची स्पष्टता निकालाअंती होईल.