महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने सुट्टी जाहीर केली आहे. मतदार सेल्फी स्पर्धा, मतदान करणाऱ्या मतदारांना हॉटेलमध्ये सवलत अशा विविध उपक्रमांद्वारे मतदान वाढविण्यासाठी शासकीय यंत्रणांसह सामाजिक व उद्योग वर्तुळातील संस्थाही पुढे सरसावल्या आहेत.

मागील काही वर्षांत मतदानाविषयी मतदारांमध्ये काहीशी अनास्था ठळकपणे अधोरेखित होते. यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होत असल्याने निवडणूक आयोगाने विविध उपक्रमातून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न केले. आयोगाच्या या प्रयत्नांना विविध क्षेत्रांत कार्यरत संस्था, व्यापारी व उद्योजकांनी पाठिंबा देत अभिनव उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. नाशिक हॉटेल असोसिएशनने मतदान करणाऱ्या ग्राहकांना दहा टक्के सवलत देण्याचे जाहीर केले आहे. मतदान करून आलेल्या ग्राहकांना अन्नपदार्थाच्या देयकावर ही सूट दिली जाईल. त्यासाठी ग्राहकाला मतदान केलेली निशाणी दाखवावी लागेल. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मंगळवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शासकीय व खासगी आस्थापना तसेच औद्योगिक क्षेत्रातील कामगार, विविध दुकाने, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाटय़गृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स आदी आस्थापनांमधील कामगारांना महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानासाठी मंगळवारी पगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी कामगारांच्या अनुपस्थितीमुळे नुकसान होईल अशा आस्थापना, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, निर्यात व्यवसायात असलेल्या कंपन्या, कायम उत्पादन सुरू असलेल्या कंपन्यातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची सवलत देण्यात येणार आहे.  या दिवशी परिवहन कार्यालयातील कामकाज बंद राहणार आहे.

मतदार सेल्फी स्पर्धा

युवा वर्गात सध्या स्मार्ट मोबाइल फोनद्वारे सेल्फी काढण्याचे प्रमाण अधिक आहे. त्याचा युवा मतदार आकर्षित होण्यासाठी  कविता राऊत फाऊंडेशन नाशिक सिटिझन्स फोरम, नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन, अंबड इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोशिएशन, क्रेडाई आदी संस्थांतर्फे मतदार सेल्फी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी नाशिककरांनी मतदानाच्या दिवशी मतदान केल्यानंतर स्वत:च्या मोबाइलवरून ७७६८००२४२४ या क्रमांकावर मतदान केल्याच्या हाताच्या बोटावरील शाईच्या निशाणीसह सेल्फी अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेतील भाग्यवान मतदारांना विविध सामाजिक संस्थेमार्फत पारितोषिक देण्यात येणार आहेत. बक्षिसांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे.