कांदा पीक पेटविणाऱ्या कृष्णा डोंगरेंच्या व्यथेने सुप्रिया सुळे गहिवरल्या

गडगडलेले भाव आणि सातत्याने होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यांच्या व्यथेकडे नेहमी दुर्लक्ष करणाऱ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना निवडणूक प्रचारादरम्यान मात्र कळवळा दाटून आला आहे. संतापाच्या भरात शेतातील उभे कांदा पीक पेटवणाऱ्या कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याचा मुद्दा प्रचारात आणून त्याच्याबद्दलची सहानुभूती प्रचारात दाखविण्याचा प्रयत्न दिसत असून याचे प्रत्यंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बुधवारच्या दौऱ्यात आले. नगरसूल येथे संबंधित शेतकऱ्याची भेट घेऊन त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करुन शेतकऱ्यांबद्दल आत्मीयता दाखविण्याचा प्रयत्न केला.

नगरसूल-सायगाव रस्त्यावर डोंगरे यांची पाच एकर कांदा शेती आहे. नोटा बंदीच्या काळात मजुरी वाटता न आल्याने दोन एकरवरील पिकावर त्यांनी आधीच पाणी सोडले होते. उर्वरीत तीन एकरवरील कांदा जीव तोडून वाढविला, पण, तयार झालेल्या मालास भाव नसल्याने काढणी व वाहतुकीचा खर्च टाळण्यासाठी त्यांनी उभे पीक जाळले. गडगडणाऱ्या भावामुळे घडलेल्या या घटनेवर प्रसारमाध्यमातून प्रकाश पडल्यानंतर प्रचारात गुंतलेल्या काही राजकीय पक्षांच्या नेत्यांचे कांद्याकडे लक्ष वेधले गेले.

वास्तविक, वर्षभरापासून कांद्याची मातीमोल भावात विक्री होत आहे. त्यास हमीभाव मिळावा, यासाठी वारंवार आंदोलने होत असली तरी त्याची दखल घेतली जात नसल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. या स्थितीत शेतकऱ्यावर ओढवलेल्या या संकटाची पाहणी करण्यासाठी खा. सुळे या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत डोंगरे यांच्या शेतावर दाखल झाल्या. शेतातील काही कांदा अर्धवट जळाला होता. त्यामुळे शेळ्या व मेंढय़ांना चरण्यासाठी सोडण्यात आले होते. पिकाची पाहणी करत सुळे यांनी शेतकऱ्यासह त्यांच्या ९० वर्षीय आजीशी चर्चा केली. या निर्णयाप्रत का यावे लागले, या प्रश्नावर तयार झालेला माल काढणे, बाजारात नेणे याचा खर्च बाजारभावातून सुटणार नसल्याचे डोंगरे यांनी सांगितले. आजींनी या वयातही पोटाची खळगी भरण्यासाठी काम करावे लागत असल्याचे सांगत तीन वर्षांपासून कांदा व मिरचीची ही स्थिती असल्याची व्यथा मांडली.  काही वेळातच परिसरातील शेतकरी या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी माल विक्री करूनही व्यापारी दीड ते दोन महिने पैसे देत नसल्याची तक्रार केली. अर्धवट जळालेला कांदा व मिरची पिशवीत भरून घेत हा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर आणि केंद्र सरकारसमोर मांडला जाईल, असे आश्वासन सुळे यांनी दिले. राष्ट्रवादीचे पदाधिकारी या शेतात येण्याच्या काही मिनिटे आधी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी संभाजी राजे पवार यांनी डोंगरे यांची भेट घेऊन सांत्वन केले. सुळे यांचा ताफा आल्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी निघून गेले. निवडणूक प्रचारात गर्क असणाऱ्या काही राजकीय पक्षांना कांद्याची आठवण झाली तर काही पक्षांना विसर पडला. राष्ट्रवादी व शिवसेनेचे पदाधिकारीवगळता कोणी भेटीला आले नसल्याचे खुद्द डोंगरे यांनी सांगितले.