हक्कापासून वंचित राहिल्याने नाराजी; म्हसरूळ येथे संतप्त मतदारांचा रास्ता रोको

एकाच वेळी असंख्य मतदारांची नावे गायब.. आतापर्यंत चार केंद्र फिरून झाली. पण नाव कुठेही सापडत नाही..  अडीच दशकांपासून मतदान करतोय, पण आता नाव नाही.. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर नाव आहे, पण मतदार यादीत नाही.. पत्नीचे नाव भलत्याच प्रभागात गेले तर पतीचे नाव गायब.. अशा स्वरूपाच्या मतदार याद्यातील गोंधळाचा फटका मंगळवारी उत्साहाने निवडणूक मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांना बसला. या गोंधळामुळे अनेक मतदारांना त्यांच्या हक्कांपासून वंचित राहण्याची वेळ आली. तर म्हसरुळ येथे संतप्त मतदारांनी रास्ता रोको करत आपल्या भावना प्रगट केल्या. यावेळी संबंधितांची मनधरणी करताना पोलीस यंत्रणेची तारांबळ उडाली.

महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी चिठ्ठीचे वाटप पालिकेकडून करण्यात आले. अनेकांना घरापर्यंत या चिठ्टय़ा मिळाल्या नाहीत. संबंधितांना आपापल्या भागातील केंद्रात या चिठ्ठी देण्याची व्यवस्था करण्यात आली. इतकेच नव्हे तर, उमेदवारांनी मतदारांना त्यांची नावे शोधून देण्यासाठी खास व्यवस्था केली होती. तथापि, मतदार यादीतील घोळामुळे सर्वत्र गोंधळाची स्थिती पहावयास मिळाली. मतदार यादीत नाव नसल्यावरून काही मतदारांनी हुज्जत घातली तर काहींनी निवडणूक आयोगाने दिलेल्या संकेतस्थळावर तक्रार नोंदवली. यादीतून नाव वगळले गेल्याची अनुभूती अनेकांना घ्यावी लागली. यादीत नाव नसल्याने अनेकांना आल्या पावली माघारी फिरावे लागले. काहींचे चेहरे हिरमुसले.

काही मतदारांची नावे भलत्याच प्रभागात टाकली गेली. त्याचा थांगपत्ता लागत नसल्याने अनेक मतदार वैतागले. काहींची नावे इतर प्रभागात सापडली तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे वगळली असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.

नावे वगळल्याची पुनरावृत्ती

म्हसरूळ परिसरात स्थानिकांची नावे मोठय़ा संख्येने वगळली गेली. केंद्रावर हा प्रकार लक्षात आला. गतवेळी याच भागात मतदारांची नावे वगळली गेली होती. हा मुद्दा धरून मतदारांनी रास्ता रोको करत या कार्यपद्धतीचा निषेध केला. या घटनेची माहिती समजल्यानंतर भाजपचे उमेदवार घटनास्थळी दाखल झाले. मतदारांनी त्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत नव्याने निवडणूक घेण्याची मागणी केली. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढली. मतदार यादीशी निगडीत प्रश्न पालिकेशी संबंधित आहे. त्या ठिकाणी तक्रार करण्याची विनंती करण्यात आली. अखेरीस नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.

मतदारांना आलेला अनुभव

*    सिडको येथील एकनाथ लोखंडे याचे मतदान प्रभाग क्र. २८ मध्ये होते. सकाळीच ते नेहमी ज्या केंद्रात मतदान करतात, तिथे मुलासोबत वाहनाने गेले. मात्र परिसरातील तीनही मतदान केंद्रात शोधाशोध करूनही त्यांना आपले नाव सापडले नाही. मुलगा अखेर निघून गेला. ते पायपीट करत पवननगरला आले. या केंद्रात नाव सापडले नाही तर घरी निघून जाईल, असा पवित्रा त्यांनी घेतला होता.

*    राणाप्रताप चौकातील रहिवासी. रमेश ठाकरे व त्यांची पत्नी शंकुतला या भाडय़ाच्या घरात राहत असल्याने मागील निवडणुकीत यादीत त्यांचे नाव नव्हते. यंदा मतदान करायचे म्हणून पत्ता बदल अर्जही भरून दिला. पण यादीत नाव नाही. महापालिकेच्या संकेतस्थळावर शोधायचे तर त्यातील ज्ञान नाही. बुथवरच्या कार्यकर्त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारा असे सांगून हात वर केले. या एकंदर घटनाक्रमाबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.

*    विश्वास चौधरी यांना तर वेगळाच प्रश्न भेडसावला. पती-पत्नी व दोन मुली व मुलगा असे त्यांचे कुटूंब. मुलींचे लग्न झाले. शिधापत्रिकेतून नावे वगळली गेली, पण मतदार यादीत त्यांची नावे आजही आहे. पण आम्ही स्थानिक असून आमची नावे नाहीत. मुलाचे नाव प्रभाग बदलत थेट पाथर्डी फाटा केंद्रात टाकले गेले, अशी तक्रार चौधरी यांनी केली.

*    प्रकाश पवार यांच्या कुटुंबीयांची नावे वेगवेगळ्या केंद्रात समाविष्ट झाली. त्यांचे नाव त्रिमूर्ती चौक येथील पेठे शाळा केंद्रात तर पत्नीचे नाव पवननगर येथील जनता विद्यालयात. आम्ही एकाच कुटुंबातील असलो तरी मतदान केंद्र वेगळी का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मागील २५ वर्षांपासून आपण नियमित मतदान करतो. यावेळी नाव नसल्याने मतदानाला मुकलो असे साहेबराव हेंबाडे यांनी सांगितले.