एबी फॉर्मचा गोंधळ, त्यावरून झालेली हाणामारी, कथित आर्थिक व्यवहाराच्या चित्रफिती, उफाळून आलेली बंडखोरी, प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात झालेली चिखलफेक, मतदारांना प्रलोभन दाखविण्याचे प्रकार.. अशा विविध कारणांनी गाजलेल्या नाशिक महापालिकेच्या ३१ प्रभागातील १२२ जागांवर उभ्या असणाऱ्या ८२१ उमेदवारांचे भवितव्य अवघ्या काही तासात उलगडण्यास सुरूवात होणार आहे. सत्ताधारी मनसेने अखेरच्या टप्प्यात विकास कामांचे जोरदार विपणन केले. राज्यात सत्ताधारी असणाऱ्या शिवसेना व भाजपने स्वतंत्रपणे रिंगणात उतरत परस्परांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीने अखेरच्या क्षणी एकत्रितपणे मैदानात उडी मारली. प्रमुख राजकीय पक्षांसह छोटे-मोठे २२ पक्ष व आघाडय़ांनी उमेदवार उभे करत आपले अस्तित्व अधोरेखीत केले. बंडखोरांमुळे अपक्षांची संख्या कमालीची विस्तारली. या एकंदर परिस्थितीत महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार, याकडे आता सर्वाचे लक्ष आहे.

महापालिका निवडणुकीत यंदा गतवेळच्या तुलनेत काहीअंशी अधिक म्हणजे ६१.६० टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत हा फरक दोन ते तीन टक्क्यांपलीकडे नसला तरी मतपेटीतून नेमके काय बाहेर येणार याची सर्व उमेदवारांना उत्सुकता आहे. चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार प्रथमच ही निवडणूक झाली. जुन्या प्रभागांची मोडतोड होऊन नवीन प्रभाग अस्तित्वात आले. त्यांचे क्षेत्र कमालीचे विस्तारल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान प्रत्येक उमेदवारासमोर होते. राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी सभा घेऊन वातावरण ढवळून निघाले. उमेदवारी नाकारल्याने झालेल्या आरोप-प्रत्यारोप, कथित आर्थिक व्यवहाराच्या चित्रफिती, नोटा बंदी, कांद्यासह कृषिमालाचे कोसळलेले भाव, गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या व्यक्ती व त्यांच्या नातलगांना दिलेली उमेदवारी, सत्ताधारी मित्रपक्षातील कलगीतुरा यामुळे प्रचार तापला असताना दुसरीकडे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी उमेदवारांनी अनेक मतदारांना लक्ष्मी दर्शनाचा योग घडविल्याचे सांगितले जाते. सत्ताधारी मनसेने नाशिकमध्ये केलेल्या विकास कामांचे राज्यात विपणन केले. शहरवासीयांना विकास कामे हवी आहेत की पैशांच्या बळावर महापालिका काबीज करू पाहणारे इतर पक्ष हे ही निवडणूक निश्चित करणार असल्याचे राज ठाकरे यांनी आधीच कथन केले आहे. नेत्यांच्या घराणेशाहीमुळे निष्ठावंतांमधील अस्वस्थता आणि काही जागांवरील बंडखोरी राजकीय पक्षांची कसोटी पाहणार आहे.

भाजप व शिवसेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर नाशिक आपणास दत्तक देण्याचे भावनिक आवाहन केले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी विविध मुद्दे उपस्थित करत सत्ताधाऱ्यांची कार्यशैली अधोरेखीत करण्याची धडपड केली. दुसरीकडे

मागील पंधरा दिवसांपासून उमेदवारांची प्रचार करताना दमछाक झाली. बुधवार हा त्यांच्यासाठी विश्रांतीचा दिवस ठरला. बुथनिहाय मतदानाची आकडेवारी हाती पडल्यानंतर बहुतेक उमेदवार आपल्या हक्कांची गोळा बेरीज करण्यात गर्क झाले.  अनेकांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदारांचे आभार मानत हा दिवस कारणी लावला. वेगवेगळ्या भागात कसे व कोणाला मतदान झाले याचा अंदाज घेतला गेला. विविध कारणांनी चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत मतदार राजा कोणाला पसंती देतो, याची स्पष्टता लवकरच होणार आहे.