महापालिका निवडणुकीची मतमोजणी गुरूवारी सकाळी दहा वाजेपासून शहरातील दहा वेगवेगळ्या ठिकाणी सुरू होणार असून सर्व ठिकाणचे पहिले निकाल दोन तासानंतर म्हणजे बारा वाजेनंतर हाती येणार आहेत. एकदा या प्रक्रियेने वेग घेतला की पुढील काही तासात टप्प्याटप्प्याने सर्व प्रभागांचे निकाल जाहीर होतील, असे निवडणूक यंत्रणेने म्हटले आहे. मतमोजणीच्या ठिकाणी कोणत्याही कारणास्तव संघर्ष होऊन अडथळे येऊ नयेत म्हणून मतमोजणी केंद्र आणि सभोवतालच्या २०० मीटरच्या परिसरात कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस आणि वाहनास प्रतिबंध करण्यात आला आहे. या परिसरात भ्रमणध्वनी, बिनतारी संदेश यंत्रणा व तत्सम साधने, घातक शस्त्रे व ज्वलनशील पदार्थ बाळगण्यास मनाई आहे.

महापालिकेच्या १२२ प्रभागांसाठी मतमोजणी झाल्यानंतर प्रभागनिहाय मतदान यंत्रे वेगवेगळ्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आली. किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याने सुस्कारा सोडणाऱ्या निवडणूक यंत्रणेने मंगळवारी मतमोजणीच्या तयारीला वेग दिला. मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी महापालिकेने अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले आहेत. प्रत्येक प्रभागात इव्हीएमसाठी दहा आणि टपाली मतदानासाठी एक अशा एकूण ११ टेबलवर मतमोजणी प्रक्रिया होईल. मतमोजणीच्या साधारणत: चार ते पाच फेऱ्या होतील.

पहिल्या फेरीला काहिसा वेळ लागेल. परंतु, पुढील फेरीला साधारणत: १५ ते २० मिनिटे लागतील. प्रत्येक मतमोजणी केंद्रावरील पहिला निकाल साधारणत: दोन तासात म्हणजे बारा वाजेपर्यंत जाहीर होईल, असे पालिका आयुक्त विजय पगार यांनी सांगितले. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मतमोजणीसाठी साधारणत: एकूण सहा ते सात तासांचा अवधी लागणार आहे.

nsk2-chart

मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. मतमोजणी केंद्र परिसरात आधीच बंदोबस्त तैनात आहे. नऊ ठिकाणी प्रत्येकी तीन तर एका ठिकाणी चार प्रभागांची मतमोजणी होईल. ही प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी मतमोजणी केंद्र व परिसरात २०० मीटरच्या आत अनधिकृत व्यक्ती व वाहनांचा प्रवेश रोखला जाणार आहे. मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त शासकीय अधिकारी, कर्मचारी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ओळखपत्र दिलेले उमेदवार व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी हे त्यास अपवाद असतील. मतमोजणीवेळी सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा येऊन जनजीवन विस्कळीत होऊ नये म्हणून मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी उपरोक्त निर्णय घेण्यात आला आहे. या परिसरात भ्रमणध्वनी, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट व तत्सम साधने, अग्निशस्त्रे, घातक शस्त्रे आदी बाळगण्यास व घेऊन फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. या बाबतची माहिती पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिली.