भाजपचे निष्ठावंत केवळ १९, तर ४७ नगरसेवक इतर पक्षांतून आलेले

महापालिकेत सत्तेचा सोपान गाठण्यात यशस्वी ठरलेल्या भाजपच्या यशाबद्दल विविध पातळीवर चर्चा होत आहे. इतर पक्षांतून आलेल्यांना उमेदवारी देत भाजपने सत्ता काबीज केली असून पक्षाचे केवळ १९ निष्ठावंत महापालिकेत पोहोचले आहेत. उर्वरित ४७ नगरसेवक हे निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षांतून आले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिका निवडणुकीचे सूक्ष्म पातळीवर नियोजन करताना भाजपने ‘निवडून येण्याची क्षमता’ या निकषाला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्याचा फटका पक्षाचा झेंडा हाती घेऊन काम करणाऱ्या अनेक निष्ठावंतांना बसला. घाऊक आयातीमुळे अनेक पदाधिकाऱ्यांची तिकिटे कापली गेली. त्यामुळे तिकीटवाटप प्रक्रियेवर अनेकांनी नाराजी व्यक्त करत विविध प्रश्न उपस्थित केले. पदाधिकाऱ्यांवर आगपाखड करत अनेकांनी बंडाचे निशाण फडकावले. तथापि, या घडामोडींचा भाजपच्या कामगिरीवर कोणताही परिणाम झाला नाही. निवडणुकीत भाजपने थोडय़ाथोडक्या नव्हे तर, तब्बल ६६ जागांवर विजय मिळविला. कोणाच्याही मदतीशिवाय भाजप सत्ता स्थापन करणार आहे. पक्षाच्या या यशात निष्ठावंतांना कितपत स्थान मिळाले आणि वेगवेगळ्या पक्षातून दाखल झालेल्यांना किती याचा आढावा घेतल्यास वेगळेच चित्र समोर येते.

स्वकीय विद्यमान नगरसेवकांना तिकीट देताना भाजपने दुजाभाव केला नाही. त्यातील काही नगरसेवक तर दोन, तीनवेळा निवडून आलेले होते. त्यामुळे या निष्ठावान नगरसेवकांना भाजपने प्राधान्याने तिकीट दिले. तसे ते निवडूनही आले.

भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले काही असेही नगरसेवक आहेत की ते आधी भाजपमध्ये होते. परंतु, मागील पंचवार्षिक निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने ते मनसेत गेले. यंदाच्या निवडणुकीआधी त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली. साधारणत: दीड वर्षांपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेल्या सुनील बागूल यांच्या मातोश्री भिकुबाई या प्रभाग सहामधून विजयी झाल्या. त्यांना निष्ठावंत म्हणायचे का, असा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर प्रश्न आहे. महापालिकेच्या पाच ते सहा प्रभागात सर्वच्या सर्व जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. इतर पक्षांना एकही जागा जिंकता आली नाही. भाजपच्या या विजयाचा लाभ निष्ठावंतांना कमी आणि ऐनवेळी दाखल झालेल्या आयारामांना अधिक झाल्याचे निकालावर नजर फिरवल्यावर लक्षात येते.