निकालाविरुद्ध कोर्टात जाण्याचा पराभूतांचा इशारा

महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय तज्ज्ञांनी शिवसेनेला अधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तविला असताना भाजपने सर्वाचे अंदाज चुकवीत बहुमत मिळविल्याने या निकालाने हैराण झालेल्या विरोधकांनी शहरातील अनेक प्रभागांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्येच गडबड असल्याचा संशय व्यक्त केला आहे. काही प्रभागातील पराभूत उमेदवारांनी यंत्रामधील गोंधळाकडे लक्ष वेधत सत्ताधाऱ्यांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप करीत याबाबत न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे महापालिकेने दिलेल्या विभागनिहाय निकालपत्रावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नसल्याचा मुद्दाही आता तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत.

cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
Attack on NIA West Bengal
पश्चिम बंगालमध्ये ‘एनआयए’च्या पथकावर हल्ला; वाहनांची तोडफोड, दोन अधिकारी जखमी
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांचा मुलगा मच्छिंद्र यांच्या उमेदवारीमुळे पंचवटीतील प्रभाग क्रमांक तीन हा प्रथमपासूनच चर्चेचा विषय ठरला होता. मच्छिंद्र सानप हे आघाडीवर असताना भाजप वगळता इतर उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींनी एकूण मतदान आणि मोजणी झालेले मतदान यात तफावत असणे, मतदान यंत्र सीलबंद नसणे अशी तक्रार करीत मतमोजणी प्रक्रिया थांबवली. प्रभाग क्रमांक तीन ब गटातील शिवसेनेचे उमेदवार प्रमिला शेवाळे यांचे पती रमेश शेवाळे यांनी याविषयी आपले म्हणणे मांडले. पहिल्या फेरीत टेबल क्रमांक पाचवरील यंत्रात ४९४ मतदान झालेले असताना मतमोजणीत त्याठिकाणी ५०४ दर्शविण्यात आले. हाच गोंधळ आठ आणि नऊ क्रमांकाच्या टेबलवरही होता. प्रत्येक ठिकाणी भाजप उमेदवारांनाच आघाडी दाखविली गेली, असा शेवाळे यांचा आक्षेप आहे. या प्रभागातील अपक्ष उमेदवार सचिन अहिरे यांना स्वत:च्या घरातून १९ मते असताना त्याठिकाणी केवळ चार मते दर्शविण्यात आल्याने तेही अचंबित झाले. अपक्ष उमेदवार टर्ले यांनीही ९० हक्काचे मतदान असताना केवळ नऊ मते पडल्याची व्यथा मांडली. प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेनेचे उमेदवार अ‍ॅड. जे. टी. शिंदे यांच्यासह इतर पराभूत उमेदवारही यंत्रणेला दोषी धरत आहेत. भाजपने सत्तेचा वापर करत निकाल बदलला, असा आरोप त्यांनी केला. पराभूत उमेदवार हर्षद पटेल यांनी यंत्रातील तांत्रिक त्रुटीकडे लक्ष वेधले. यंत्र सीलबंद नव्हते. बऱ्याच ठिकाणी प्रत्यक्ष मतमोजणी व झालेले मतदान यात तफावत असल्याची तक्रार त्यांनी केली. निवडणूक निर्णय अधिकारी नशेत होते, या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला. प्रभाग ३० मधील सेना उमेदवार संजय चव्हाण यांनी मतमोजणीच्या ठिकाणी यंत्रात बिघाड झाल्याने ती मेमरी चिप दुसऱ्या यंत्रात टाकत असताना प्रत्यक्ष उमेदवार किंवा त्याचे प्रतिनिधी यांच्यासमोर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नसल्याचा दावा केला. आठ ते १० यंत्रे बंदिस्त करताना सीलबंद करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला. अल्पसंख्याकांची अधिक संख्या असलेल्या भागात भाजप उमेदवारास साडेतीन हजार मते आणि अल्पसंख्याक समाजाच्या उमेदवाराला केवळ १५० मते मिळाल्याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.या संपूर्ण प्रकाराविरोधात न्यायालयीन लढा देणार असल्याचे सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांनी नमूद केले. दरम्यान, महापालिकेच्या वतीने निकालाच्या दिवशी रात्री उशिराने दिलेल्या त्या त्या विभागातील निवडणूक निकालपत्रावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नसल्याने तो अधिकृत धरावा की नाही, अशी साशंकता आता व्यक्त होऊ लागली आहे. याविषयी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी ज्यांना स्वाक्षरी असलेले निकालपत्र हवे त्यांनी महापालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

सर्व घटनांचे चित्रीकरण

प्रभाग तीनमध्ये टेबल क्रमांक पाचच्या यंत्रावर ८० व ‘डिस्प्ले’वर ९० मते दिसत होती. यंत्राचा डिस्प्ले खराब असल्याने ही अडचण आली. मात्र मेमरी चिप दुसऱ्या यंत्रात टाकल्यावर एकूण मतमोजणी व्यवस्थित झाली. याचे संपूर्ण चित्रीकरण करण्यात आले असून पराभूत उमेदवार केवळ गैरसमजुतीतून अफवा पसरवत आहेत.    अजय चारठणकर (निवडणूक निर्णय अधिकारी)