रंगमंचावर एका सुखांतिकेसाठी सर्व तजवीज करून ठेवण्यात आली असताना प्रत्यक्ष नाटक सुरू झाल्यावर अचानक कलाकारांनी नाटकात नसलेले प्रसंग घुसडविल्यास सुखांतिकेऐवजी प्रेक्षकांना शोकांतिका पाहण्याची वेळ यावी, तसेच काहीसे नाशिक महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या बाबतीत झाले आहे. निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळतील अशी भाकिते जवळपास सर्वच माध्यमांनी आणि राजकीय पंडितांनी केली असताना निकालानंतर जे वास्तव पुढे आले त्यामुळे बहुमत मिळविणाऱ्या भाजपसह पराभूत शिवसेना आणि राजकीय पंडितही चक्रावले आहेत. आपण खरोखरच इतके यश मिळविले आहे यावर अजूनही विश्वास बसत नसल्याची भाजपचे नेते गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया त्यासाठीच महत्वाची. शिवसेनेचे संघटन आणि मुळातच नाशिककरांच्या मनात सेनेविषयी असलेला ओलावा यामुळे शिवसेना सर्वाधिक जागा जिंकणार अशी तज्ज्ञांची अपेक्षा होती. पण उलटेच झाले, ते का?

भाजपचे यश शिवसेनेच्या अपयशातच सामावले आहे. स्थानिक शिवसेनेत नेत्यांची बिल्कूल कमतरता नाही. परंतु, या नेत्यांमध्ये एकसंघाऐवजी गटागटाने पुढे जाण्याची स्पर्धा लागलेली असते. जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांचा गट, विनायक पांडे यांचा गट, सिडको परिसरात सवतासुभा निर्माण करण्याच्या प्रयत्नातील सुधाकर बडगुजर यांचा गट आणि हे कमी म्हणून की काय, या सर्व गटांना नाशिकशी वेगवेगळ्या अर्थाने संबंध राखून असलेल्या मुंबईतील नेत्यांकडून मिळणारे पाठबळ वेगळेच. खरे तर पक्षाला मैदान मारण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असताना समाजप्रिय प्रतिमा असलेल्या निष्ठावंतांना उमेदवारी देण्याची गरज असताना इतर पक्षांमधून बाहेर पडणाऱ्या प्रस्थापितांना आपल्या पक्षात अक्षरश: खेचून ‘मातोश्री’वर नेऊन त्यांच्या हाती भगवा देण्यात या विविध गटांमध्ये अहमहमिका लागली. अशा खोगीरभरतीमुळे पक्ष वाढल्याचा गंड निर्माण झाला. परंतु, ही केवळ सूज होती. पक्षनिष्ठेशी बेदखल बाहेरील मंडळी केवळ उमेदवारी या एकाच कारणास्तव शिवसेनेत आल्याने निष्ठावंतांना डावलून त्यांना उमेदवारी दिली गेली. त्यांच्या उमेदवारीचे वेगवेगळ्या अर्थाने समर्थनही केले गेले. या आयारामांच्या उमेदवारीमुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी प्रचार करण्यापेक्षा गप्प बसणे पसंत केले. विद्यार्थी सेनेपासून कार्यरत देवानंद बिरारी हे त्यासाठी प्रातिनिधिक उदाहरण ठरावे. अशा १० ते १२ ठिकाणी नाराज शिवसैनिकांनी प्रचारात केवळ ‘देखल्या देवा दंडवत’ अशी भूमिका घेतल्याने ते सर्व उमेदवार पराभूत झाले. उमेदवारांना पक्षाचा अधिकृत अर्ज म्हणजेच एबी अर्जाचे वाटप करण्यासाठी विनाकारण झालेला विलंब आणि झालेला गोंधळ यामुळे शिवसेनेला अखेर १० उमेदवार पुरस्कृत करणे भाग पडले. म्हणजेच त्यांना पक्षाचे चिन्ह मिळू शकले नाही. याचाच अर्थ १२२ जागांसाठी होणाऱ्या लढतीत शिवसेना आधीच ‘वजा १०’ अशी उतरली होती. या सर्व पुरस्कृत उमेदवारांचा पराभव झाला. आपल्याच घरातून अधिकाधिक उमेदवार कसे उभे राहतील, यासाठी झालेल्या संघर्षांत महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांना माजी महापौर विनायक पांडे यांच्या समर्थकांकडून झालेली मारहाण पक्षांतर्गत संघर्षांचा कळस ठरला. ऐन निवडणुकीच्या दारात घडलेल्या या प्रकाराने युवा तसेच पांढरपेशा वर्गात वेगळाच संदेश गेला. शिवसेनेतील हाणामारी हे भाजपसाठी यशाचे सर्वात मोठे आणि निर्णायक राजकीय वळण ठरले. एरवी शिवसेनेकडे जाणारे मतदानही या घटनेमुळे दुरावले.

अशा कारणांमुळे विजयापासून शिवसेनेला दूर राहावे लागले असताना वास्तव कारणे स्वीकारण्यापेक्षा भाजपकडून मतदारांना दाखविण्यात आलेले आर्थिक प्रलोभन, मतदान यंत्रातील घोटाळा अशी तकलादू कारणे पुढे करून स्थानिक पदाधिकारी स्वत:चे समाधान करून घेत असतील तर, तो निवडणूक झाल्यानंतर झेंडे आवरण्याचाच प्रकार म्हणावा लागेल.