भाजपा सरकारमुळे शेतकऱ्यांची होरपळ झाली. शेतकरी राजा हवालदिल झाला. त्यात नोटाबंदी हे संकट दुष्काळात तेरावा महिना आहे.  नोटबंदी विरोधात मूठ आवळून दाखवा शिवसेनेच्या वचननाम्यात आम्ही थापा मारल्या नाहीत. देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा, उत्तरप्रदेश सारखं इथल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी द्या, नवीन कर्ज कमी व्याजाने द्या आम्ही तुम्हाला जाहीर पाठिंबा देऊ असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर अनेक टीकास्त्रही सोडले.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा नाशिकमधील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान पार पडली. यावेळी ते बोलत होते.

अजय बोरस्ते व विनायक पांडे यांच्यातील वादावर बोलताना ते म्हणाले की, मधल्या काळात एक छोटीशी घटना घडली. यावरून काही लोकांना वाटले की शिवसेनेची वाट लागली. परंतु तसे काही घडले  नाही. कारण  शिवसेनेची वाट लावणारा अजून जन्माला यायचा आहे. केवळ मतं पाहिजे म्हणून ‘अच्छे दिन’च्या थापा आम्ही मारत नाही. असे म्हणत यामुळे पक्षाचे देखील नुकसान झाले नाही. मी जे काही बोलतो ते रोख ठोक आणि स्पष्ट बोलतो. कारण याचे बाळकडू मला वडीलांकडून मिळाले असल्याचेही ते पुढे म्हणाले.

ब्रिटीश काळातील नाशिकमधील पूर्वइतिहासावर भाष्य करताना त्यांनी स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर, अनंत कान्हेरे, जॅक्सनचा वध यांचे अनेक दाखले दिले.

शेतकरी कामगार पक्षाचे राजू शेट्टी यांनी पक्षाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल उद्धव यांनी त्यांचे आभार मानले. शिवसेनेचे मंत्री राजीनामा देणार का या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, पत्रकार आमच्या आमदारांना नेहमी प्रश्न विचारतात की राजीनामा कधी देणार? आमचे आमदार राजीनामा देतील पण आधी कामे करून दाखवतील असे म्हणत ‘राजीनामा’च्या मुद्द्याला त्यांनी बगल देण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्र्यावर टीका करताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री फोन फिरवून राज्यातील सर्व पोलीस ठाण्यातील गुंडांची लिस्ट पोलिसांकडून मागवली आणि हे गुंड खरच त्यांच्या ताब्यात आले आणि भाजपमध्ये गेल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

चोर – दरोडेखोरांवर जितके गुन्हे नाहीत तितके शिवसैनिकांवर आहेत. लोकांच्या भल्यासाठी जर हे गुन्हे त्यांचावर लादले जाणार असतील तर त्या प्रत्येक शिवसैनिकाच्या पाठीशी मी उभा असल्याचेही ते म्हणाले.

 नोटाबंदी

३१ डिसेंबर रोजी सर्व लोक टीव्ही बंद करून बसले होते मोदी काय बोलतील याची लोकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. कोणासाठी तुम्ही नोटबंदी केली? नोटाबंदी होऊन किती दिवस झाले? काय झाले त्याचे? भाजपामध्ये सर्व गावगुंड एकत्र आल्यावर त्या पक्षाचे तरी काय होणार असे प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केले. महिलांना त्रास देणाऱ्या गुंडांचा हात काढून हातात दिल्याशिवाय शिवसैनिक राहणार नाहीत, असेही ते म्हणाले.  भाजपला मेहबुबा मुफ्ती चालू शकतात, पण शिवसेना पक्ष चालत नाही. आम्ही नाकारलेले गुंड भाजपने घेतले. मंत्रालयाचे गुंडालय करणार आहात का?’ अशीही बोचरी टीकाही भाजपावर उद्धव यांनी केली.

मुंबईची म्हणे आम्ही पटना केली? कोणत्या नजरेतून भाजपने असे पाहिल्याचेही ते म्हणाले.  सामनावर बंदी आणावी या पत्रावर बोलताना ते म्हणाले, ‘सामना’वर बंदी आणून तर दाखवा, मग पाहा काय करतो ते, सामना हे वृत्तपत्र नसून आमचे शस्त्र आहे. ‘सामना’ला नख लावला तर महाराष्ट्र पेटून उठेल.’ असेही ते म्हणाले.

मनसेलाही चुचकारले

मनसेत गेलेले अनेक जण कंटाळून शिवसेनेत परत आले. त्यांना तिथे काम करता येत नव्हते म्हणून पक्षात ते परतलेत असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मनसेवर टीका केली.

राज्यमंत्री दादा भुसे, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, बबन घोलप, विजय करंजकर, पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

भाजपचे अधिकृत उमेदवार अहमद काझी, काँग्रेसचे प्रीतेष जयप्रकाश छाझेड यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.