नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत पाच जणांनी माघार घेतली असून आता रिंगणात एकूण १७ उमेदवार आहेत. अर्ज माघारीची मुदत शुक्रवारी संपल्याने आता ही निवडणूक १७ उमेदवारांमध्ये रंगणार असल्याचे स्पष्ट झाले.

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी एकूण २४ उमेदवारांनी ३९ अर्ज दाखल केले होते. निवडणूक आयोगाच्या विहित निकषानुसार प्रत्येकाने अर्ज भरून कागदपत्रे जोडणे बंधनकारक होते. छाननी प्रक्रियेत अपूर्ण कागदपत्रे, स्वाक्षरी नसलेले, निकषांनुसार माहिती न देणे या कारणास्तव दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते. राष्ट्रीय समाज पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरणा-या उमेदवाराचा अर्ज पक्षाचा अधिकृत अर्ज शाईने लिहिलेला नसल्याने अपक्ष म्हणून स्वीकारण्यात आला. शुक्रवारी दुपारी ही मुदत संपुष्टात आल्यानंतर १७ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात राहणार असल्याचे स्पष्ट झाले.

विठ्ठल गुंजाळ, पुरूषोत्तम रकिबे, सुरेश टाके, सुभाष डांगे, मनोज पवार या उमेदवारांनी माघार घेतल्याची माहिती निवडणूक शाखेकडून देण्यात आली. या निवडणुकीच्या रिंगणात १७ पैकी तीन उमेदवार राजकीय पक्षांचे आहेत. तर उर्वरित १४ उमेदवार अपक्ष आहेत.
पक्षीय उमेदवारांमध्ये काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे, भाजपचे डॉ. प्रशांत पाटील व भाकप डाव्या आघाडीचे प्रकाश (राजू) देसले हे निवडणूक लढणार आहेत. अंतिम उमेदवारांची यादी विभागीय कार्यालयात प्रकाशित करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांमध्ये मतपत्रिका छपाई पूर्ण होणार असल्याचे निवडणूक अधिका-यांनी सांगितले.