महापालिका आणि जिल्हापरिषद निवडणूकनिकालाचे पडसाद राज्यात सर्वत्र उमटत आहेत. या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे याकडे अनेकांनी खिलाडूवृत्तीने न पाहता तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशा गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींच्या मुसक्या आवळण्याचे काम पोलीस यंत्रणेकडून जिल्ह्याभरात सध्या सुरु आहे.

नाशिकमध्ये गुरुवारी महापालिका निवडणुक मतमोजणी सुरु असताना अनेकांनी पराभव जिव्हारी लागल्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आज शहरातील २० जणांना तर जिल्हातून ४० पेक्षा अधिक संशयितांना ताब्यात घेत सर्वांवर गुन्हे नोंदविण्यास सुरूवात केली आहे.  गुरुवारी नाशिक महापालिका मतमोजणी प्रक्रिया शांततेत सुरू असतांना शहरातील संवेदनशील भागातील पराभूत उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांकडून तोडफोड करण्यात आली. बागवानपुरा येथे बबलू पठाण व त्याच्या कार्यकर्त्यांनी वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी ११ जणांना ताब्यात घेतले. सबंधीतांवर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

पंचवटी येथे मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत गोंधळ घालणा-या ९ कार्यकर्त्यांना पोलीसांनीताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सिन्नर येथे शिवसेनेचे कार्यकर्ते शरद बिन्नर हे गेल्याकाही दिवसापासून सिन्नर परिसरात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रचाराचे काम करत आहेत. या कालावधीत भाजपचे सुदाम बोडके व अन्य ६ लोकांनी सेनेचे काम करू नकोस आमच्या सोबत काम कर असा त्यांना सल्ला दिला. मात्र बिन्नर हे सेनेच्या प्रचारात व्यस्त राहिले. निकालापूर्वी बिन्नर मोहदरी गावातील वडझरी फाट्यावर अन्य काहीसहका-यांसह बोलत असतांना रात्री उशीराने बोडके व ६ कार्यकर्ते गाडीतून उतरले. मतदानाची कुरापत काढत त्यांच्याशी या जमावाने वाद घातला. आणि बिन्नर यांना शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

तसेच सिन्नर येथील सुदाम बोडके हे जिल्हा परिषद निवडणुकीत उतरले. पक्षाचा प्रचार सुरू असतांना मोह गावी जात असतांना संशयित संजय सानप व त्याच्या सहका-यांनी त्यांची गाडी अडवत आमच्या विरूध्द निवडणुकीस का उभा राहिला? असा त्यांना जाब विचारत लाठ्यांच्या सहाय्याने त्यांना बेदम मारहाण केली. त्यांना शिवीगाळ करत तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी देत सानप व त्याच्या सहका-यांनी तेथुन पळ काढला. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

घोटी येथे विजयी मिरवणूक काढण्यास परवानी नाकारली असतानाही घोटी गावातून हॉटेल किनारा ते शिवाजी चौक परिसरातून उदय जाधव व त्यांच्या सहका-यांनी मिरवणूक काढल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मालेगावमध्येही प्रशासकीय परवानगी नसताना विजयी उमेदवाराची मिरवणुक काढल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाच्या आ. अशिफ शेख यांच्यासह ३०० जणांवर जमावबंदी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.