सध्या देशभरात गोरक्षकांच्या हिंसाचाराचा मुद्दा गाजत असतानाच नाशिक महानगरपालिकेत एक अनोखा प्रकार पाहायला मिळाला. पालिकेच्या गुरूवारी झालेल्या महासभेत चक्क एका गायीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. एरवी समाजातील एखाद्या प्रथितयश व्यक्तीचे किंवा सभागृहाच्या सदस्याचे निधन झाल्यास संसद, विधानसभा आणि पालिकांमध्ये संबंधित व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्याचा रिवाज आहे. मात्र, नाशिक महानगरपालिकेत गायीला श्रद्धांजली वाहण्यात आल्याचे ऐकून अनेकजण चक्रावले आहेत. नाशिकमध्ये १३ जुलै रोजी एका गायीचा विजेचा धक्का लागल्यानंतर खड्ड्यात पडून मृत्यू झाला होता. या अपघातानंतर वॉर्ड क्रमांक २५ मधील शिवसेना नगरसेवक श्यामकुमार साबळे यांनी या गायीवर अंत्यसंस्कार केले होते. या गायीच्या मृत्यूसाठी साबळे यांनी नाशिक महानगरपालिकेला जबाबदार ठरवले होते. त्यानंतर गुरूवारी साबळे यांनी सर्वसाधारण सभेत या गायीला श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव मांडला. विशेष म्हणजे एरवी विळ्या-भोपळ्याचे सख्य असलेल्या भाजपसह अन्य नगरसेवकांनी तो मान्यही केला आणि त्यानंतर पालिका सभागृहात अभूतपूर्व प्रकार पाहायला मिळाला. यानंतर महापौरांनी गायीच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले. मात्र, हा सर्व प्रकार पाहून महासभा पहावयास आलेले नाशिककर देखील अचंबित झाले.