भाजपची खेळी यशस्वी; मनसेला आरोग्य समितीचे उपसभापतिपद

महापालिकेत पुनस्र्थापित करण्यात आलेल्या शहर सुधार, विधी व आरोग्य समित्यांच्या सभापती व उपसभापतीपदांसाठी भाजपने पक्षातील नव्या-जुन्यांचा मेळ साधताना विरोधकांमध्ये फूट पाडण्यात यश मिळवले. आरोग्य समितीचे उपसभापतीपद मनसेला बहाल करत सातपूर प्रभाग समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीतील मदतीची परतफेड केली.

पुनस्र्थापित विषय समित्यांचे सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीने महापालिकेच्या वर्तुळात नव्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. महापालिकेची निवडणूक भाजप व शिवसेना या मित्रपक्षांमध्ये झाली होती. ६६ जागा जिंकून भाजपने एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले. शिवसेनेला विरोधकाची भूमिका शिल्लक राहिली. गतवेळी सत्ताधारी असणाऱ्या मनसेचे पानिपत झाले. त्यांना केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले.

शुक्रवारी महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते यांच्या उपस्थितीत सभापती व उपसभापतीपदासाठी अर्ज भरण्यात आले. विधी समिती सभापतीपदासाठी शीतल माळोदे, उपसभापती पदासाठी राकेश दोंदे, शहर सुधारणा सभापतीपदासाठी भगवान दोंदे तर उपसभापतीपदासाठी स्वाती भामरे, वैद्यकीय साहाय्य आणि आरोग्य समिती सभापतीपदासाठी सतीश कुलकर्णी तर उपसभापतीपदासाठी शांता हिरे यांनी तर मनसेतर्फे योगेश शेवरे यांनी अर्ज दाखल केला आहे. मनसेला पाठिंबा देण्याचे निश्चित झाल्यामुळे भाजपच्या नगरसेविका शांता हिरे यांचा अर्ज माघारी घेतला जाईल. सभापतीपदासाठी भाजपने शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघातून एका सदस्याला प्रतिनिधित्व दिले आहे. उपरोक्त समित्यांमध्ये विरोधी शिवसेना अल्पमतात आहे. यामुळे ही निवडणूक अविरोध होईल असे चित्र आहे.

दरम्यान, या समित्यांच्या सभापती-उपसभापतीपदाच्या निवडणुकीचा विषय पावणे दोन महिन्यांपासून भिजत पडला होता. कायदेशीर अधिष्ठान नसल्याचा मुद्दा मांडून काँग्रेसने या समितीला आक्षेप घेतला. सदस्य नियुक्तीचा विरोध धुडकावत सत्ताधारी भाजपने तीनही समित्यांवर तौलनिक बळानुसार एकूण २७ सदस्यांची नियुक्ती केली. आक्षेप घेणाऱ्या काँग्रेसने आपल्या सदस्यांची नावे दिली नाहीत. त्याचा लाभ अखेर मनसेला झाला. ऐनवेळी मनसेच्या तीन सदस्यांची नियुक्ती करीत भाजपने विरोधकांना कात्रजचा घाट दाखविला. या घडामोडीनंतर प्रशासनाने सभापती व उपसभापती पदासाठीच्या निवडणुकीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला होता.

त्यानुसार निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित झाला आहे. अपर आयुक्त जोतिबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २४ जुलै रोजी ही निवडणूक होणार आहे. सकाळी साडे दहा वाजता विधी समिती, बारा वाजता शहर सुधार समिती आणि दीड वाजता वैद्यकीय आणि आरोग्य समितीच्या सभापती-उपसभापतीपदासाठी निवडणूक होणार आहे. या समित्यांना दहा लाख रुपयांपर्यंतच्या कामांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे.

मनसेला पाच वर्षे भाजपसोबत राहण्याची इच्छा

मनसेच्या कार्यकाळात पहिल्या अडीच वर्षांत भाजपने साथ दिली होती. यावेळी पूर्ण बहुमत असले तरी मनसेला जवळ करून भाजपने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे शिवसेनेला डिवचून विरोधकांमध्ये फूट पाडण्याची खेळी केली आहे. सातपूर प्रभाग सभापतीपदाच्या निवडणुकीत मनसेच्या सदस्यांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आरोग्य समितीचे उपसभापतीपद मनसेला देण्याचे निश्चित करण्यात आल्याचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी सांगितले. मनसेला पाच वर्ष भाजपसोबत राहण्याची इच्छा आहे. संबंधितांमार्फत जिथे गरज भासेल, तिथे मदत होणार असेल तर शिक्षण समिती व अन्य विषय समित्यांचे सभापतीपदही त्यांना देण्याचा विचार होईल, असे सानप यांनी नमूद केले.