तिकीट विक्री प्रकरण, त्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिप्स, विविध पक्षांमधून झालेले इनकमिंग, त्यामुळे पक्षातील निष्ठावंतांवर झालेला अन्याय, त्याचा परिणाम म्हणून झालेली बंडखोरी, गुंड प्रवृत्तीच्या लोकांना दिलेला पक्ष प्रवेश अशी प्रतिकूल परिस्थिती असूनही भाजपने नाशिकमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. गुरुवारी मतमोजणीला सुरुवात होताच मिळवलेली आघाडी भाजपने शेवटपर्यंत कायम ठेवली. तर नाशकातील सत्ताधारी असलेल्या मनसेची निवडणुकीत धूळधाण झाली आहे.

गुंडांचा पक्षप्रवेश आणि तिकीटांसाठी पैसे घेतल्याची व्हिडिओ क्लिप या घटनांचे परिणाम भाजपला सहन करावे लागतील, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र प्रत्यक्षात केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांना नाशिकमध्ये संधी दिली. कुंभमेळ्यावेळी नाशिक शहरात करण्यात आलेल्या विकासकामांचा मोठा फायदा भाजपला झाला आहे. ‘भाजपला मत म्हणजे विकासाला मत’ हे पटवून देण्यात यश आल्याने भाजप नाशिक महापालिकेतल पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.

राज्यातील सत्तेत भागीदार असलेली शिवसेना भाजपच्या यंदा एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. मुंबई, ठाण्यात करण्यात आलेल्या कामांच्या आधारे शिवसेनेने नाशिकमध्ये प्रचार केला होता. नाशिकमध्ये उमेदवारापेक्षा पक्षाकडे पाहून मतदान होईल, असा अंदाज शिवसेनेला होता. मात्र शिवसेनेचा हा अंदाज चुकीचा ठरला. केंद्रासह राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपलाच नाशिककरांनी साथ दिली. राज्यातील सत्तेत सहभागी असूनही कायम विरोध करणाऱ्या शिवसेनेला बाजूला सारत नाशिककरांनी भाजपच्या बाजूने कौल दिला आहे.

भाजपने नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवन पवारसारख्या गुंडांना पावन करुन घेतले होते. यामुळे भाजपबद्दल मतदारांच्या मनात नकारात्मक भावना निर्माण झाली होती. यानंतर भाजपकडून निवडणुकीची तिकीटे विकण्यात आल्याच्या व्हिडिओ क्लिपदेखील व्हायरल झाल्या. या सगळ्याचा फटका भाजपला बसणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेनेत तिकीट वाटपावरुन गदारोळ झाला. नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी त्यांच्या कुटुंबातील चारजणांसाठी तिकीटांची मागणी केली होती. मात्र शिवसेनेचे शहरप्रमुख अजय बोरस्ते यांनी एकाच कुटुंबाला संधी देण्यापेक्षा सर्व कार्यकर्त्यांना सामावून घेण्याची भूमिका घेतली. त्यामुळे विनायक पांडे यांच्या समर्थकांनी बोरस्ते यांना मारहाण केली. याचा फटका शिवसेनेला निवडणुकीत बसला.

राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निवडणुकीत भुईसपाट झाली. पाच वर्षांपूर्वी राज ठाकरेंवर विश्वास दाखवत नाशिककरांनी मनसेच्या ४० उमेदवारांना विजयी केले होते. मात्र मधल्या काळात राज ठाकरेंचे नाशिककडे दुर्लक्ष, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेची झालेली बिकट अवस्था यामुळे नाशिककरांनी राज ठाकरेंच्या मनसेकडे दुर्लक्ष केले. मनसे सत्तेत आल्यावर सुरुवातीची दोन वर्षे शहराला आयुक्त देण्यात आला नव्हता. तत्कालीन राज्य सरकारने आयुक्तांची नेमणूक न करता मनसेची कोंडी केली होती. त्या अनुभवावरुन बोध घेत नाशिककरांनी यंदा राज्यात सत्ताधारी असलेल्या पक्षालाच महापालिकेत संधी दिली. केंद्र आणि राज्यातील पक्ष शहरातही सत्तेत आल्यास शहराचा विकास वेगाने होतो, या विचार करुन नाशिककरांनी महापालिका निवडणुकीत मतदान केले.