राजकीय तज्ज्ञांचे सर्व अंदाज धुळीस मिळवित महापालिका निवडणुकीत भाजपचा वारू चौखूर उधळला असताना त्यास थोडय़ाफार प्रमाणात पश्चिम विभागात रोखण्यात शिवसेना यशस्वी झाली

शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी पंडित कॉलनी परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक सातमधून विजयी होत पालिकेत सलग चवथ्यांदा प्रवेश केला आहे. २००२ पासून ते निवडून येत आहेत. त्यांनी भाजपचे नरेंद्र पवार यांना पराभूत केले. बोरस्ते यांनी याआधी उपमहापौरपद तसेच गटनेतेपदही भूषविले आहे. बोरस्ते यांना आपले संपूर्ण पॅनल विजयी करता आले नाही. ब गटातून भाजपच्या हिमगौरी आडके, क गटातून स्वाती भामरे आणि ड गटातून भाजप आमदार सीमा हिरे यांचे दीर योगेश हिरे हे विजयी झाले. सीमा हिरे यांची नगरसेवक आणि आमदार म्हणून असलेली प्रतिमा, सर्वाना मदत करण्याचा स्वभाव योगेश हिरे यांच्या कामी आला. डॉ. बाळासाहेब आहेर, त्यांची पत्नी शोभना आहेर त्यानंतर एका पंचवार्षिकाचा कालावधी जाऊन डॉ. राहुल आहेर या आहेर कुटुंबियांना साथ देणाऱ्या मतदारांनी या निवडणुकीत डॉ. राहुल आहेर यांची बहीण हिमगौरी आहेर-आडके यांना विजयी केले. शिक्षण मंडळाचे उपसभापतीपद याआधीच्या पंचवार्षिकात भूषविलेले राजेंद्र देसाई यांच्या पत्नी शिवसेनेच्या संगीता देसाई यांना क गटात पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अशी जबाबदारी सांभाळेलेल दिवंगत गोपाळराव गुळवे यांची सून सुनिता गुळवे यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. परंतु, हिमगौरी आडकेंकडून त्यांचा पराभव झाला. माजी नगरसेवक आणि भाजपची उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून जनतेचा कौल मागणारे मधुकर हिंगमिरे यांना पराभवास सामोरे जावे लागले. प्रभाग क्रमांक १२ मध्ये ब गटात महापालिकेच्या स्थापनेपासून म्हणजेच १९९२ पासून सलग नगरसेवकपद भूषविलेले काँग्रेसचे उत्तम कांबळे यांचे पुत्र समीर कांबळे यांनी भाजपचे हेमंत धात्रक यांचा पराभव करून वडिलांचा वारसा पुढे सुरू ठेवला आहे. अ गटातून भाजपच्या प्रियंका घाटे विजयी झाल्या. क गटातून भाजपच्या प्रेरणा बेळे यांनी काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांच्यावर प्रारंभी आघाडी घेत सर्वानाच चकीत केले. ड गटातून चार वेळा काँग्रेसच्या तिकीटावर नगरसेवकपद भूषविलेले आणि या निवडणुकीत भाजपची उमेदवारी करणारे शिवाजी गांगुर्डे यांनी काँग्रेसचे उमेदवार आणि शहराचे पहिले महापौर शांतारामबापू वावरे यांचे भाचे शैलेश कुटे यांचा पराभव केला. कुटे यांची बहीण सुजाता डेरे मनसेच्या विद्यमान नगरसेविका आहेत.

narendra modi
“जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक होणार, राज्याला लवकरच…”, पंतप्रधान मोदींच्या तीन मोठ्या घोषणा
amit shah
महाराष्ट्राला काय दिले, पवारांनीच हिशेब द्यावा! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
pratibha dhanorkar
काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांकडे ३९ कोटींचे ‘हातउसने’!
congress nominated abhay patil from akola
काँग्रेसकडून अकोल्यात डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी; तिरंगी लढत होणार

सिडकोतील प्रभाग २४ मध्ये अ गटात अटीतटीच्या लढाईत शिवसेनेच्या कल्पना पांडे यांनी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका अश्विनी बोरस्ते यांच्यावर मात केली. ब गटात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नाना महाले यांचे पुतणे राजेंद्र महाले यांनी २००७ आणि २०१२ नंतर सलग तिसऱ्यांदा पालिकेत प्रवेश केला आहे. त्यांनी शिवसेनेचे कैलास चुंभळे यांचा पराभव केला.

राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांची पत्नी तथा विद्यमान नगरसेविका कल्पना चुंभळे यांनी शिवसेनेच्या तिकीटावर क गटातून विजय मिळविला. मागील निवडणुकीत अल्प मतांनी विजयाने हुलकावणी दिलेले शिवसेनेचे प्रवीण (बंटी) तिदमे यांनी यावेळी ड गटातून विजय साजरा केला.