ध्वनिक्षेपकावरून चाललेला प्रचार.. उमेदवारांचा कार्यकर्त्यांच्या साथीने घरोघरी सुरू असलेला प्रत्यक्ष संवाद.. शक्तिप्रदर्शनासाठी निघालेल्या प्रचारफेऱ्या आणि समोरासमोर प्रतिस्पर्धी आल्यानंतर झालेली घोषणाबाजी.. महापालिका निवडणुकीचा प्रचार संपुष्टात येण्याच्या मार्गावर असताना शनिवारी प्रचाराचा ज्वर शिगेला पोहोचल्याचे पाहावयास मिळाले. या दिवशी बहुतेक उमेदवारांचा प्रभागात फेरी काढण्यावर भर होता. एकाच दिवशी लक्षणीय मागणी आल्याने कार्यकर्त्यांचा भाव वधारला. त्यामुळे गर्दी जमविताना उमेदवारांची दमछाक झाली.

महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. जाहीर प्रचाराची मुदत रविवारी सायंकाळी पाच वाजता संपुष्टात येत असल्याने सर्वपक्षीय उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याची धडपड केली. अनेक प्रभागात ढोल-ताशांच्या गजरात प्रचार फे ऱ्या काढण्यात आल्या. प्रभाग पिंजून काढताना उमेदवार आणि कार्यकर्त्यांना चांगलीच पायपीट करावी लागली. फेऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय राहिला आहे. दुसरीकडे गर्दी जमविताना उमेदवारांना हात मोकळा सोडावा लागला. कार्यकर्त्यांना चहा, नाश्ता, जेवणासाठीचे पार्सल अशी व्यवस्था करण्यात आली. यावेळी प्रचार करताना उन्हाच्या वाढत्या झळांचा सामना करताना काहींनी सावलीचा आधार घेत फेरी पूर्ण केली तर काहींनी पक्षाच्यावतीने देण्यात आलेल्या प्रचार साहित्याचा आधार घेतला. काही ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांच्या फेऱ्या आमनेसामने आल्या. स्पर्धकांनी हस्तांदोलनाद्वारे शुभेच्छा दिल्या तर काही ठिकाणी घोषणाबाजीचे प्रकार घडले. दरम्यान, मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काही उमेदवारांनी वेगवेगळ्या कल्पना लढविल्या. ‘ आधी करून दाखविले’ या उक्तीनुसार काहींनी प्रभागात नागरिकांना स्वखर्चाने कचरा संकलित करण्यासाठी कचरा कुंडी स्थापित केली.

अशोक चव्हाण यांची आज सभा

नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेस समितीच्यावतीने उमेदवारांच्या प्रचारासाठी रविवारी दुपारी अडीच वाजता वडाळा रोड येथील मैदानावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची सभा होणार आहे.