ठाकरे बंधुंवर मुख्यमंत्र्यांचे टिकास्त्र

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ग्रामीण भागात सभा घेण्यासाठी मात्र गेले नाहीत. ज्या महापालिकांचे अंदाजपत्रक मोठे आहे, केवळ त्या शहरांमध्येच ठाकरे यांनी सभा घेतल्याची शिवसैनिकांची भावना आहे. दुसरीकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना केवळ नकला करण्याचे काम राहणार असून त्यांचे कार्यालय कृष्णकुंज पुरते सिमित राहणार असल्याची टोलेबाजी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधुंवर शरसंधान साधले. आदल्या दिवशी याच मैदानावर मनसेच्या झालेल्या सभेत राज यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख ‘भाजपकुमार थापाडे’ असा केला होता. हा संदर्भ पकडत मुख्यमंत्र्यांनी लबाडांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन केले.

भाजपच्या प्रचारार्थ शनिवारी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित सभेत मुख्यमंत्र्यांनी उद्धव आणि राज यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले. निवडणूक आली की काही पक्ष शेतकऱ्यांप्रती कळवळा दाखवतात. राज्यात २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहे. कर्जमाफीची मागणी करणारे उद्धव ठाकरे ग्रामीण भागात सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गेले नाहीत. त्यांना मोठय़ा अंदाजपत्रकांच्या महापालिकांमध्ये रस असल्याचे त्यांच्या प्रचारसभांमधून दिसून येत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मनसेच्या ताब्यात असणाऱ्या महापालिकेकडे एकही रुपया नव्हता. या कामांसाठी संपूर्ण निधी राज्य शासनाने द्यावा यासाठी खुद्द राज ठाकरे व मनसेच्या महापौरांनी आपल्याशी संपर्क साधला.

कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी शासनाने महापालिकेला दिलेल्या २२१९ कोटींच्या निधीतून शहराचा चेहरामोहरा बदलल्याचा दावा फडणवीस यांनी केला. राज ठाकरे नकला चांगल्या करतात. गणेशोत्सवात त्यांना कार्यक्रमासाठी बोलवता येईल, असा टोलाही त्यांनी लगावला.

सेना व मनसेकडून अतिशय खालच्या पातळीवरून जाऊन प्रचार केला जात आहे. संबंधितांच्या गोटातून कपोलकल्पीत शहर विकास नियंत्रण नियमावली समाजमाध्यमांवरून व्हायरल करण्यात आली. या बनावट नियमावलीतून दर्शविल्या जाणाऱ्या जाचक अटी प्रत्यक्षात तशा नाहीत. लहान रस्त्यांवरील घरांच्या विकासासाठी अतिरिक्त टीडीआर, कपाटाचा प्रश्न मार्गी लावला जाणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, कांदा उत्पादकांना दिलासा दिला जाईल. महापालिकेची एकहाती सत्ता द्या. पाच वर्षांत विकास नाशिकचा विकास करून दाखवितो. अन्यथा पुन्हा तोंड दाखविणार नाही असे सांगत नाशिक दत्तक देण्याचे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, मैदान निम्म्यापेक्षा अधिक रिकामेच होते.