शहरातील श्वानांची संख्या वाढू नये म्हणून दर वर्षी हजारो भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जात असल्याचा दावा महापालिका करत असताना दुसरीकडे दिवसागणिक मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचा विरोधाभास समोर येत आहे. यामुळे उपरोक्त शस्त्रक्रियेतून नेमके काय साध्य होते असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
शहरातील अनेक भागांत अधूनमधून पिसाळलेल्या कुत्र्याकडून हल्ल्याचे प्रकार घडत असतात. आजवर त्यात कित्येक बालके व नागरिक जखमी झाले आहेत. ‘स्मार्ट सिटी’ योजनेत विविध संकल्पना मांडणाऱ्या महापालिकेने मोकाट कुत्रे या विषयाकडे डोळेझाक केली. मोकाट कुत्र्यांची संख्या आटोक्यात ठेवण्यात पालिका अपयशी ठरल्याचे दिसून येते. गेल्या काही वर्षांपासून कुत्र्यांवर निर्बिजीकरण केले जाते; परंतु त्यांची वाढती संख्या नियंत्रणात आली नसल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे. गल्लीबोळात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे शहरवासीयांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. रात्रीच्या सुमारास त्यांचा उपद्रव अधिकच वाढतो. भटक्या कुत्र्यांनी विद्यार्थीच नव्हे तर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. रात्री भटक्या कुत्र्यांची टोळकी बहुतांश कॉलनीत भ्रमंती करतात. ही टोळकी वाहनांच्या मागे धावल्याने अपघात होऊन वाहनधारकही जखमी झाले आहेत. रात्री विचित्र आवाजात ओरडणे, वाहनांच्या सीट फाडणे, मागे धावणे, पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुडगूस या संदर्भात आरोग्य विभागाकडे तक्रारी येतात. पिसाळलेल्या कुत्र्याची तक्रार आल्यास या विभागाचे पथक त्या कुत्र्याला केवळ पकडून देखरेखीखाली ठेवू शकते. ज्या कॉलनी परिसरात अस्वच्छता आहे, उकिरडय़ावर अन्न टाकले जाते, तिथे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढते. यामुळे नागरिकांनी खराब झालेले अन्नपदार्थ बाहेर न टाकल्यास त्यांना अटकाव घालता येऊ शकतो. स्वच्छ कॉलनीत भटका कुत्रा अपवादाने आढळतो, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
या प्रक्रियेत भटक्या कुत्र्यांपासून असणारा धोका कमी करण्यासाठी लसीकरण करण्यात येते. प्रत्येक कुत्र्यामागे ९०० हून अधिक रुपये खर्च केले जातात. गतवर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत तब्बल ४ हजार ३४६ कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले. म्हणजे या कामावर वर्षभरात सुमारे ४५ लाख रुपयांचा खर्च झाला. या स्थितीत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी झाल्याची स्थिती नाही. पालिकेने मध्यंतरी दिलेल्या माहितीनुसार २००७ ते फेब्रुवारी २०१३ या कालावधीत अर्थात सहा वर्षांत ३६ हजार ७३२ कुत्र्यांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यासाठी दोन कोटी ५८ लाख ३६ हजार ५२० रुपयांचा खर्च करण्यात आला. त्यात १९,६३२ नर तर १७,१०० मादय़ांचा समावेश होता. आजवरच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास इतक्या मोठय़ा प्रमाणात निर्बिजीकरण झाल्यास शहरात एकही असा मोकाट कुत्रा नसावा की ज्याच्यावर ही शस्त्रक्रिया होणे बाकी असावे. भटके कुत्रे चावल्यामुळे होणाऱ्या आजाराचे गंभीर परिणाम असतात. निर्बिजीकरण शस्त्रक्रियेवेळी श्वानांचे लसीकरण केले जाते. याद्वारे त्यांच्यापासूनचा धोका कमी केला जातो. हजारोंच्या संख्येने भटक्या कुत्र्यांवर ही शस्त्रक्रिया करून नेमके काय साध्य झाले, हा प्रश्न आहे.

वर्षभरात केवळ १२९ श्वानांची नोंदणी
भटक्या कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया करण्याबरोबर महापालिका क्षेत्रातील पाळीव श्वानांची नोंद आरोग्य विभाग करतो. शहरवासीयांचे श्वानप्रेम गेल्या काही वर्षांत चांगलेच वाढले आहे. यामुळे पाळीव श्वानांची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. तथापि, श्वान पाळणारे नागरिक त्याच्या रीतसर नोंदणीकडे दुर्लक्ष करतात. यामुळे २०१५ या वर्षांत केवळ १२९ पाळीव श्वानांची नोंद पालिकेकडे झाली असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
buldhana murder marathi news, buldhana ambedkar jayanti murder marathi news
बुलढाण्यात भीम जयंतीला गालबोट! चाकूहल्ल्यात युवक ठार; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे पोलिसांवर होता दुहेरी ताण
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी