शहरात तीन मजले पाडण्याची प्रथमच कारवाई
‘कपाट’ प्रकरणावरून पालिका आयुक्त आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यात जुंपली असताना आणि त्यात समाज माध्यमावरून अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आव्हान दिले जात असतानाच सोमवारी महापालिकेने उच्चभ्रु वसाहतीतील जुन्या इमारतीवर चढवलेले अनधिकृत मजले जमीनदोस्त करण्याचे काम सुरू केले. एखाद्या इमारतीवरील तीन मजल्यांवर हातोडा पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. या कारवाईमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून ‘कपाट’ प्रकरणात शासनाने नियमित करण्याबाबत निर्णय न घेतल्यास पालिका त्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा यापूर्वीच आयुक्तांनी दिला आहे. अतिक्रमण निर्मूलनात छोटी-मोठी बांधकामे हटवत पालिका लुटुपुटूची लढाई खेळत असल्याचा आक्षेप घेतला जात असताना या कारवाईने त्यास छेद दिला गेला आहे.
शहरातील जवळपास ७०० अतिक्रमणांची यादी महापालिकेने तयार केली असून त्या विरोधात गेल्या काही दिवसात धडक कारवाई आरंभण्यात आली आहे. त्या अंतर्गत कॉलेज रोडवरील सन्मित्र अपार्टमेंट या इमारतीवरील तीन मजले हटविण्याची कारवाई आजवरची सर्वात मोठी ठरली. एनबीटी विधी महाविद्यालयासमोरील कुलकर्णी बागेत ही इमारत आहे. साधारणत: दोन दशकांपूर्वीच्या या इमारतीवर कधीकाळी ‘आप’शी संबंधित असणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाने वाढीव तीन मजले चढवण्याचे काम हाती घेतल्याचे सांगितले जाते. इमारतीतील खालील दोन मजल्यांवर रहिवासी वास्तव्यास आहेत. जवळपास वर्षभरापासून वाढीव मजल्याचे बांधकाम सुरू होते. पालिकेची परवानगी न घेता हे काम सुरू असल्याने अनधिकृत बांधकामाच्या यादीत ते समाविष्ट झाल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख आर. एम. बहिरम यांनी दिली. कॉलेज रोड हा उच्चभ्रु वसाहतीचा परिसर म्हणून ओळखला जातो. जुन्या इमारतीवर या पध्दतीने मजले चढवत विकासक १२ सदनिका तयार करत होता. सदनिकांचे ७० टक्के काम जवळपास पूर्ण झाले होते.
सोमवारी सकाळी अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक पोलीस बंदोबस्तात या ठिकाणी धडकले. इमारतीच्या जुन्या दोन मजल्यावर कुटुंबिय वास्तव्यास असल्याने वाढीव मजले हटवताना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे होते. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन त्या अनुषंगाने सूचना केल्या. वाढीव तीन मजल्यांवरील एकूण सर्व सदनिका जमीनदोस्त करण्यात येणार आहे. हे काम अतिशय काळजीपूर्वक करावे लागणार असल्याने अतिक्रमण काढण्यास किती कालावधी लागेल हे सांगता येणे अवघड असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अतिक्रमण निर्मूलनाचा रहिवाशांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून पुरेशी दक्षता घेतली गेली. पालिकेच्या या कारवाईमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
‘कपाट’ प्रकरणावरून पालिका आयुक्त आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यात जुंपली आहे. काही दिवसांपूर्वीच पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पत्राद्वारे ‘कपाट’ विषयात बांधकाम व्यावसायिकांनी नागरिकांची कशी फसवणूक
केली याची साद्यंत माहिती सादर करत शासन स्तरावरून ही बांधकामे अधिकृत करण्याबाबत निर्णय न झाल्यास पालिका आपल्या स्तरावर कायदेशीर कारवाई करेल, असा इशाराही दिला होता. पालिका आयुक्तांच्या पत्रानंतर बांधकाम व्यावसायिकांनी समाज माध्यमांवर ‘बांधकामे पाडूनच दाखवा’ असे प्रतिआव्हान दिले होते. या घडामोडी सुरू असताना पालिकेने मोठी कारवाई करत सूचक संदेश दिला आहे.

घिसाडघाईने कारवाई
कॉलेजरोडवरील सन्मित्र अपार्टमेंटवरील वाढीव बांधकामास राज्य शासनाने आयटी पार्कसाठी मान्यता दिली आहे. तसेच या संदर्भातील बांधकाम परवानगीसाठीची कागदपत्रे महापालिकेत सादर करण्यात आली आहे. नियमावलीची कोणतीही माहिती न घेता महापालिकेने ही कारवाई केली. या संदर्भात न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. बांधकाम हटविण्याबाबत तीन दिवसांपूर्वी नोटीस दिली गेली. लगेचच घिसाडघाईने ही कारवाई करण्यात आली. या संदर्भात पोलिसांना देखील आम्ही महापालिकेला प्रतिबंध करावा, अशी विनंती केली. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केले. महापालिकेची कार्यशैली ‘हम करे सो कायदा’ अशी असल्याचे पहावयास मिळाले.
– साहेबराव कदम (बांधकाम व्यावसायिक)