जिल्हा बँक, नांदगाव व मनमाड बाजार समिती, दोन्ही नगरपालिका अशी तालुक्यातील एकेक सत्तास्थाने ताब्यात घेत सुरू असलेली शिवसेनेची यशाची घोडदौड आता पंचायत समितीपर्यंत येऊन ठेपली असून २००२ नंतर १४ वर्षांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या ताब्यात नांदगाव पंचायत समिती आली आहे. जिल्हाप्रमुख सुहास कांदे आणि ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या रणनीतीचे हे यश असल्याचे मानले जात आहे. सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादीचा यावेळी  सफाया झाला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीतील यशाच्या दृष्टीने तालुका संपूर्णपणे शिवसेनामय करण्यासाठी पावले टाकण्यात येत आहेत.  या निवडणुकीत भाजपने भालुर गटासह तीन गण ताब्यात घेत सर्वाना चकीत केले. भालुर गटातील विजय भाजपसाठी अधिक महत्त्वपूर्ण मानला जात आहे. भाजपच्या या विजयाचे श्रेय माजी आमदार संजय पवार व त्यांचे बंधू असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार यांना जाते.

पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून भाजपमध्ये दाखल झालेल्या संजय पवार यांना नगर परिषद निवडणुकीत सूर गवसला नव्हता. पालिका निवडणुकीत भाजपचा एकही उमेदवार निवडून न आल्याचे शल्य बोचत असलेल्या पवार यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर संपूर्ण लक्ष केंद्रित करून एक गट आणि तीन गणात यश संपादन केले. भालुर गटातील विजय म्हणजे पवारांसाठी राजकीय पुनर्वसनाची संधी म्हणावी लागेल. राष्ट्रवादीचे आमदार पंकज भुजबळ यांनी मतदारांना ‘मीच उमेदवार आहे’ असे म्हणून केलेले भावनिक आवाहनदेखील मतदारांनी नाकारले. एकही गट अथवा गण ताब्यात न आल्याने राष्ट्रवादीची पुढील वाटचाल अधिकच बिकट झाली आहे. भुजबळ यांच्याबद्दल जनतेच्या मनात अद्यापही सहानुभूती असली तरी त्यांच्या भोवतीची चौकडी पराभवासाठी कारणीभूत ठरल्याचे मानले जाते.  साकोरा गटात बंडखोरीने राष्ट्रवादीचा घात केला. अगदी सोपा वाटणारा विजय राष्ट्रवादीच्या हातातून गेला. या गटात मतदारांनी जातीय गणितही धुडकावून लागले. भालुरला पवार बंधू एकत्र असताना न्यायडोंगरी गटात मात्र आहेर बंधूंमध्येच घमासान झाले. आजी विरुद्ध नातीच्या लढाईत नातीला मतदारांनी कौल दिला. या गटातील सावरगाव व न्यायडोंगरी गण काँग्रेसला जिंकता आले नाही. जातेगाव या नवीन गटांत भौगोलिक अस्मितेचा संघर्ष दिसून आला. बोलठाणच्या सुनीता पठाडे या सर्वाधिक मताधिक्याने निवडून आल्या. भालुर गट जिंकणारे माजी आमदार संजय पवार यांना जातेगावमधून मधुबाला खिरडकर यांच्या रूपाने घाटावर तिसरा विजयी उमेदवार मिळाला. मात्र मांडवड गणात भाजपला मोठा पराभव पत्करावा लागला. एकूणच तालुक्याचे राजकारण भगव्या वळणावर आले असल्याने प्रस्थापितांच्या पुढे नवनेतृत्वाचे आव्हान उभे राहिले आहे.