नेहरू उद्यान परिसर मोकळा झाला

नेहरू उद्यानातील अतिक्रमणांवर बुधवारी अखेर हातोडा घालण्यात आला. या कारवाईत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा विरोध धुडकावत मोहीम तडीस नेण्यात आली. बागूलांच्या हस्तक्षेपामुळे सत्ताधारी भाजपची मात्र, अडचण झाली आहे. दरम्यान,  या ठिकाणी खाद्यपदार्थाची दुकाने थाटली जाऊ नये यासाठी लगोलग उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

नेहरू उद्यान परिसरातील बहुतांश जागा प्रदीर्घ काळापासून खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी बळकावली आहे. उद्यानाची मुख्य संरक्षक भिंत आणि बाहेरील बाजूस बांधण्यात आलेली भिंत यामधील जागेसह सभोवतालच्या जागेत दिवसा व रात्री खाद्यपदार्थाची दुकाने थाटली जातात. उद्यानात जाणारा मार्गावर विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने त्या ठिकाणी बच्चे कंपनी व पालक अपवादाने जातात. एका राजकीय नेत्याच्या पाठबळामुळे विस्तारलेले हे अतिक्रमण महापालिकेची डोकेदुखी ठरले होते. कारवाईनंतर स्मार्ट सिटी योजनेंतर्गत नेहरू उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या संदर्भातील निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यारंभ आदेशही दिला गेला आहे. प्रत्यक्षात काम सुरू करण्यासाठी अतिक्रमण हटविण्याचे आव्हान होते. चुंचाळेचा भंगार बाजार हटविण्याचा अनुभव असल्याने  अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक जेबीसी व अन्य यंत्रणा घेऊन येथे दाखल झाले. पथकाला पाहताच खाद्य विक्रेत्यांनी गाडय़ा लावल्या होत्या, ते गाडय़ांसह गायब झाले. उद्यानाच्या सभोवताली खाद्य विक्रेत्यांच्या गाडय़ा लागू नये म्हणून जेसीबीच्या सहाय्याने परिसरात खोदकाम  तर डांबरीकरण पूर्णत: उद्ध्वस्त करण्यात आले.

दरम्यान, या कारवाईची माहिती मिळताच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल यांनी धाव घेतली. यामुळे विक्रेते बेरोजगार होणार असून त्यांना पर्यायी जागा देण्याची मागणी त्यांनी केली. परंतु, उपस्थित अधिकाऱ्यांनी पर्यायी जागा देण्याचा विषय आपल्या अखत्यारीत नसल्याचे सांगून कारवाई पूर्णत्वास नेली. भाजप पदाधिकाऱ्याने कारवाईत हस्तक्षेप केल्यामुळे या अतिक्रमणाला कोणाचे पाठबळ होते तेदेखील समोर आल्याची स्थानिक व्यापारी व नागरिकांची प्रतिक्रीया आहे.