जम्मू-काश्मीरमध्ये काही तरुणांच्या गटाकडून लष्करी जवानांवर होणारी दगडफेक हे आता नित्याचे बनलेले चित्र आहे; परंतु लष्करी जवानांचा अनादर केवळ तिथेच होतो असे नव्हे, तर तो मंगळवारी नाशिकमध्येदेखील झाल्याचे पाहावयास मिळाले. महात्मा गांधी रस्त्यावर दुचाकी घसरल्याचे निमित्त झाले आणि संबंधित वाहनधारकाने दोन लष्करी जवानांना अक्षरश: धारेवर धरले. एका ज्येष्ठाने मध्यस्थी करीत वाद मिटविला; परंतु तोपर्यंत घसरून पडलेल्या दुचाकीस्वाराला उचलण्यासाठी धावलेल्या लष्करी जवानाला तीव्र मनस्ताप सहन करावा लागला.

मंगळवारी दुपारी रिमझिम स्वरूपात पाऊस पडत असल्याने रस्ते आधीच ओलसर झाले होते. एमजी रोडवर नेहमीप्रमाणे अतिशय संथपणे दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू होती. या भागातून दोन जवान लष्करी बुलेटवरून मार्गस्थ होत असताना अकस्मात त्यांच्या समोरील दुचाकी घसरली. घसरलेल्या दुचाकीचा धक्का अन्य एका दुचाकी वाहनाला लागला. हे पाहून बुलेटवरील जवानाने रस्त्यावर पडलेली दुचाकी उचलून संबंधित चालकास बाहेर काढले. वाहतुकीचा खोळंबा झाल्याने त्याची दुचाकी बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. परंतु याच वेळी ज्या दुचाकीला नंतर धक्का लागला होता, त्या चालकाने रस्त्यातच दुचाकी उभी ठेवून जवानांना खडे बोल सुनावण्यास सुरुवात केली.

मद्यपान करून बुलेट चालवितात काय, असा प्रश्न केला. दुचाकी घसरण्यास नेमके कारण कोणाला ज्ञात नव्हते. दुचाकी घसरल्याने बघ्याची गर्दी जमली. इतर वाहनधारकही कसला वाद सुरू आहे हे पाहण्यात मग्न होते. जी दुचाकी घसरली तिच्या चालकाला इजा झालेली नव्हती. तो शांत असताना दुसरा दुचाकीधारक भर रस्त्यात जवानांना सुनावत होता.

रस्त्यावर वाहतूक कोंडीत अडकलेले वाहनधारक एखादा चित्रपट पाहावा असे हे दृश्य पाहत होते. कोणी मध्यस्थी करण्याच्या भानगडीत पडले नाही. त्याच वेळी हा प्रकार एका ज्येष्ठ पादचारी व्यक्तीच्या लक्षात आला. सुनावण्यात मग्न असलेल्या दुचाकीचालकाला त्यांनी शांत करून निघून जाण्यास सांगितले. लष्करी जवानांना रस्त्यामधून बुलेट बाजूला नेण्यास सांगितली. चूक लष्करी जवानांची असल्यास त्याविरोधात संबंधित चालकास पोलिसांकडे दाद मागण्याचा पर्याय होता. परंतु त्याने तो न स्वीकारता तोंडसुख घेण्यात धन्यता मानली. दुचाकी वाहनधारक तावातावाने बोलत असताना दोन्ही लष्करी जवान शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकत होते. त्यांनी कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही. या घटनाक्रमाने जम्मू-काश्मीर असो वा नाशिक असो, लष्करी जवानांचा अनादर करण्यास कोणी मागे नसल्याचे चित्र समोर आले.