पावसाने उघडीपघेताच खरेदीची जोमाने सुरुवात

तेजाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपोत्सवास सोमवारी गाय-वासरू पूजन अर्थात वसुबारसने उत्साहात सुरुवात झाली. आकर्षक रोषणाई, पणत्यांची आरास, आकाशकंदील यांच्या लखलखाटाने परिसर प्रकाशमय झाला आहे. मागील आठवडय़ात सातत्याने झालेल्या मुसळधार पावसाने उघडीप घेतल्याने रखडलेली दीपावली खरेदी जोमाने सुरू झाली आहे. महागाईची पर्वा न करता नवीन वस्तूंच्या खरेदीद्वारे दणक्यात दीपोत्सवाचे स्वागत करण्यात सारे मग्न झाले आहेत. यंदा पाऊसमान चांगले राहिल्याने शेतकऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने आनंदात साजरी होईल असे चित्र आहे.

निश्चलनीकरणानंतर थंडावलेली बाजारपेठ जीएसटी लागू झाल्यावर मंदीच्या खाईत लोटली गेली. बाजारपेठेत वर्षभरानंतर दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर चैतन्य आल्याचे पाहावयास मिळत आहे. समाधानकारक पाऊस, कामगार वर्गाच्या हाती वेळेवर पडलेला बोनस याचे सकारात्मक परिणाम बाजारपेठेतील उलाढालीवर होण्याची चिन्हे आहेत. दिवाळीची खरेदी कित्येक दिवस आधीच झाली असती. परंतु, परतीच्या पावसाचे त्यात विघ्न आले. सात दिवस पाऊस सुरू राहिल्याने चिंताक्रांत झालेले व्यापारी काहीसे सुखावत आहे. पावसाने उघडीप घेतल्यापासून शहर व ग्रामीण भागातील बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहेत. ऐन दिवाळीत खरेदीचा उत्साह ओसंडून वाहू लागल्याचे चित्र आहे. या निमित्ताने बाजारपेठेतील मरगळ झटकली जाईल अशी व्यापारी वर्गाची आशा आहे. यंदा प्रकाशाचा उत्सव सलग सहा दिवस रंगणार आहे. मागील काही वर्षांत एकाच वेळी दोन दिवस येत असल्याने त्याचे दिवस कमी-अधिक होत असत. यंदा मात्र दीपोत्सवाचा पुरेपूर आनंद मिळणार आहे. त्याची सुरुवात वसुबारसने झाली. अनेक ठिकाणी गाय वासरुंचे पूजन करण्यात आले. लक्ष्मीपूजन व भाऊबीजसाठी अजून तीन ते चार अवधी असतांना बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह ओसंडून वहात आहे. लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक केरसुणी, लाह्य़ा, बत्तासे आदींनी बाजारपेठा व्यापल्या आहेत. अभ्यंग स्नानासाठी आवश्यक उटणे, सुगंधी तेलाची काही खास उत्पादने बाजारात आली आहेत. लक्ष्मीपूजनसाठी व्यापारी वर्ग सज्ज होत आहे. खतावण्या, चोपडय़ा यांना व्यापारी लक्ष्मी म्हणून पूजत असल्याने लक्ष्मी पूजनाचे महत्त्व त्यांच्यासाठी अनन्यसाधारण. तर घराघरांमध्ये केरसुणीला लक्ष्मीच्या स्वरूपात पूजले जाते. केरसुणी, पणत्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. खरेदीसाठी लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त चांगला मानला जात असल्याने सराफ बाजार, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने, वाहन दुकानांमध्ये नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात आगावू नोंदणी करून ठेवली आहे.

आज धन्वंतरी पूजन

मंगळवारी धनत्रयोदशीनिमित्त घरोघरी धन-धान्याची पूजा होणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात आयुर्वेदाचे प्रवर्तक धन्वंतरी यांचा जन्म याच दिवशी झाल्याने वैद्य मंडळी धन्वंतरीचे पूजन करतात. आरोग्यरूपी धन सर्वाना प्राप्त व्हावे याही उद्देशाने धनत्रयोदशीला धन्वंतरीचे पूजन केले जाते. या बाबतची माहिती वैद्य विक्रांत जाधव यांनी दिली. धन्वंतरीचे विचार ज्या माध्यमातून सर्वासमोर आले त्या चरक संहितेत वैद्यकीय क्षेत्रासाठी एक प्रतिज्ञा दिली आहे. सर्व शाखेतील चिकित्सकांनी धन्वंतरीसमोर ही शपथ घेऊन रुग्ण व डॉक्टरांचे नाते दृढ करण्यासाठी प्रयत्न करण्याची सध्या नितांत गरज आहे. चरकाचार्यानी चिकित्सा, व्याधी, प्रतिबंध यांचे स्पष्टीकरण करताना उत्तम, रुग्ण परिचारिका, औषध व उत्तम वैद्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. विशेषत: वैद्याने व्यवसायाची सुरुवात करण्याअगोदर एक आगळीवेगळी शपथ सांगितली आहे. त्यात डॉक्टर, वैद्याची कामे स्पष्ट केली आहेत. मनुष्याच्या आरोग्याचे सर्वतोपरी संरक्षण, विविध व्याधी, विकृती लक्षणे निर्माण करणाऱ्या घटकापासून सर्व आयुधे, ज्ञानाचा, चिकित्सा पध्दतीचा वापर कोणत्याही शास्त्राच्या व्यक्तीने करणे गरजेचे आहे, याकडे वैद्य जाधव यांनी लक्ष वेधले. आजच्या दिवशी घेतली जाणारी चरकाचायार्ंची शपथ आधुनिक युगातही महत्त्वपूर्ण मानली जाते. त्यात रुग्णाची अहोरात्र सेवा, व्यवसायाशी प्रामाणिकता, नीतिमूल्यांचे पालन, नम्रता, व्यसनांपासून दूर या गोष्टींना महत्त्व देण्यात आले आहे.