निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी नाकाबंदी सुरु असताना पोलिसांनी वाहन चोर, सोनसाखळी चोर यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. मोहिमेअंतर्गत महाविद्यालयीन दोन युवकांना दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. नाशिकरोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

याठिकाणी पोलिसांनी नुकतेच सशस्त्र संचलन केले होते. या कालावधीत पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार नाशिकरोड येथील देवी चौक येथे दोन युवक हे संशयास्पदरित्या वाहन घेऊन उभे असल्याचे समजले. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून संशयित विनय हिवाळे (१९, रा. जेलरोड) व अनंत सोनवणे (१९, रा. जेलरोड) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील दुचाकीला कोणताही नंबर नव्हता. पोलिसांनी त्यांचाकडे वाहनाच्या कागदपत्रांबाबत चौकशी केली असता दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी आपला धाक दाखवताच या संशयितांनी दुचाकी चोरल्याचे कबुल केले. विनय हा के.के. वाघ महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत असून अनंत आरंभ महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयितांना पोलीस कोठडी सुनावली.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत संशयितांनी नाशिकरोड, देवळाली, उपनगर, आडगाव येथून होंडा कंपनीची शाईन, एक हिरोहोंडा पॅशन, पॅशन प्लस, दोन हिरो होंडा पल्सर, अॅक्टिव्हा चोरल्याची कबुली दिली. संशयितांकडून सुमारे दोन लाख रुपये किंमतीच्या गाड्या जप्त करण्यात आल्या असून संशयितांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता आहे.