• पोलीस आयुक्तांचे आवाहन
  • मैत्रेय कंपनीच्या ठेवीदारांना परतावा देण्यास सुरूवात

मैत्रेयच्या गुंतवणूकदारांना ठेवी परत करण्यास सुरुवात झाली असून आजचा दिवस ऐतिहासिक आहे. पोलिसांच्या अर्जाला न्यायालयाने मान्यता दिली हे महत्त्वाचे आहे. गुन्ह्यांच्या तपास कामात पोलीस, न्यायालय व्यवस्था आणि प्रसारमाध्यमे हे महत्त्वाचे असतात. हा तपास यशस्वीपणे करणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानत पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी पुढील काळात न्यायालयीन निर्देशानुसार उर्वरित ठेवीदारांना परतावा दिला जाणार असल्याचे सांगितले. गुंतवणुकीच्या भ्रामक योजनांना बळी पडू नये. रिझव्‍‌र्ह बँकेची मान्यता असणाऱ्या कंपन्यांच्या योजनांमध्ये नागरिकांनी गुंतवणुकीचा विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले. मैत्रेय कंपनीच्या ठेवीदारांना शुक्रवारी पोलीस आयुक्तांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात परतावा देण्यात आला. यावेळी १२५ जणांना एकूण १७ लाख रुपयांचे धनाकर्ष देण्यात आले. आपली रक्कम हाती पडल्याचे पाहून ठेवीदारांनी पोलिसांमुळे हा दिवस पहावयास मिळाल्याची भावना व्यक्त करत आभार मानले. ठेवीदारांतर्फे पोलीस आयुक्त व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांसह ठेवीदारांकडून नाशिक पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.

गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास ज्यांना परतावा दिला जाणार होता, त्यांच्यासह ज्यांना तो मिळण्याची प्रतीक्षा आहे, अशा सर्वाची तुडुंब गर्दी झाली. बहुतेकांचा सर्वाना पैसे मिळणार असा समज होता. प्राधान्यक्रमाच्या यादीची अनेकांना कल्पना नव्हती. सरकारवाडा पोलीस ठाण्यात हीच स्थिती होती. काही गोंधळ होऊ नये, यासाठी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. देशात आजवर उघडकीस आलेल्या या स्वरुपाच्या घोटाळ्यांमध्ये अतिशय कमी कालावधीत गुंतवणूकदारांना पैसे परत मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. पोलिसांच्या कामगिरीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्राद्वारे अभिनंदन केले. प्रारंभी कमी रकमेची गुंतवणूक असणारे आणि मुदत पूर्ण झालेल्या नाशिकमधील गुंतवणूकदारांना परतावा दिला जात आहे. त्या अंतर्गत १२५ जणांना परताव्याचे वितरण करण्यात आले. पोलीस आयुक्तांच्या हस्ते ११ ठेवीदारांना प्रातिनिधिक स्वरूपात धनाकर्ष देण्यात आला. ठेवीदारांच्यावतीने पोलीस आयुक्त जगन्नाथन यांच्यासह सरकारवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तपासात महत्त्वाची भूमिका बजावणारे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील व श्रीकांत धिवरे, न्यायालयात सरकारी पक्षाची बाजू मांडणारे अजय मिसर यांचाही सत्कार करण्यात आला. ठेवीदारांच्यावतीने वैशाली पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. जी रक्कम मिळणार नव्हती, ती आज मिळाली. पोलीस आयुक्तांमुळे हा दिवस दिसल्याची भावना व्यक्त केली. या कार्यामुळे पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. दरम्यान, उर्वरित गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा समितीच्या छाननीनंतर तयार करण्यात येणाऱ्या यादीप्रमाणे इस्क्रो खात्यातून ठेवीदारांच्या खात्यात वर्ग केला जाईल. गुंतवणूकदारांची गर्दी वाढू लागल्याने सरकारवाडा पोलीस ठाण्याबाहेर त्या संबंधीचा फलक लावण्यात आला आहे.

गुंतवणूकीचा ‘कानाला खडा’

मैत्रेय कंपनीत पुंजी गुंतवत हात पोळून घेणाऱ्या गुंतवणूकदारांना जादा परताव्याच्या योजनांपासून चार हात दूर राहण्याचा धडा मिळाला आहे. गुंतवणूकदारांच्या प्रतिक्रिया त्याची साक्ष देणाऱ्या ठरल्या. मखमलाबाद येथील रवींद्र पिंगळे यांनी आजवर जे झाले, ते झाले, आता कानाला खडा. असे सांगत कोणत्याही योजनेत पैसे गुंतवणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी एक लाख रुपये मैत्रेयमध्ये गुंतविले होते. सभागृहातील गर्दी पाहून पैसे नक्की मिळणार का, हा प्रश्न पडल्याचे त्यांनी नमूद केले. कुंभारवाडा येथील मंदा कदम या वृत्तपत्रातील बातमी वाचून कार्यक्रमस्थळी पोहोचल्या. स्वत:चे ८० हजार रुपये त्यांनी मैत्रेयमध्ये गुंतविले. ज्या महिन्यात आपले पैसे मिळणार होते, तेव्हाच मैत्रेय कंपनी बंद पडली. रक्कम कशी मिळणार हे माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. आपले पैसे अडकले, शिवाय आपल्या सांगण्यावरून नातेवाईकांनी अडीच लाख रुपये गुंतविले. कंपनी बंद पडल्याने सारे अडचणीत सापडल्याची भावना कदम यांनी व्यक्त केली. बाळाला घरी सोडून आलेल्या हर्षदा खैरनार यांनाही पैसे मिळणार की नाही, हे ज्ञात नव्हते. आपली कोणाबद्दल तक्रार नाही, केवळ कष्टाचे पैसे परत मिळावेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. निशा वरखेडे यांनी नाशिक पोलिसांनी गुंतवणूकदारांना ही रक्कम परत मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली, त्याबद्दल त्यांचे आभार मानले.