नाशिक शहरात आठवडाभरापासून विनाहेल्मेट वाहनधारकांविरुद्ध कारवाई सुरू आहे. ते जरी स्वागतार्ह असले तरी ठिकठिकाणी निर्माण होणारी वाहतूक कोंडी, गलथान वाहतूक व्यवस्था आदींविषयीही नाशिककरांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहात आहेत. त्यातीलच एक अजित टक्के यांनी मांडलेली त्यांची भावना..

[jwplayer wN2mCKjd]

हेल्मेट सक्ती, अपघात मुक्ती, हेल्मेट वापरा, प्राणहानी टाळा.. ही वाक्ये रस्त्यांवर सारखी नजरेस पडतात. अर्थ समजत असतो. काहीतरी अपूर्णतेची टोचणी मनाला लागत असते. वरवर पाहता दोन्ही घोषणा सकारात्मक भावना जागृत करतात, परंतु वास्तवात या दोन्ही घोषणा वर्तमानातील प्रखर वास्तव नाकारतात. भविष्याचाही विचार करत नाहीत. या घोषणांच्या वाक्यांमधील मोकळ्या जागेत कोणता अर्थ दडलाय? आपण त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करुया..

प्राणहानी केव्हा होते? अपघात झाल्यावर. अपघात केव्हा होतात? निष्काळजीपणे गाडी चालविल्यामुळे. बेदरकार, बेफान गाडी चालविल्याने आणि वाहतूक, रहदारीचे नियम न पाळल्यामुळे. ही उत्तरे आपल्यास मान्य असतील तर मग फक्त हेल्मेट घातल्यामुळे अमरत्वाचा परवाना मिळाल्याच्या भावनेने बेदरकार गाडी चालवून, पादचाऱ्यांना धडक देऊन प्राणहानी टळणार आहे का? आपल्याला नक्की काय हवे आहे? हेल्मेटची विक्री वाढवायची की सरकारी खजिन्यातील दंडाच्या तडजोड (?) रकमेची संख्या वाढवायची आहे? की खरेच शहरातील रहदारी-वाहतूक व्यवस्था सुधारून ती अपघातमुक्त बनवायचे आहे?

शहरात अपघात का होतात, प्राणहानी का होते, याची कारणे शोधण्यासाठी वाहतुकीचे चित्र डोळ्यासमोर आणल्यास काय दिसते?

* नागरिक सहजतेने सिग्नल तोडतात. हिरव्या सिग्नलनंतर १० सेकंदांत ० ते १०० वेग गाठण्याची पराकाष्ठा करतात.

*  झेब्रा क्रॉसिंग ओलांडून अध्र्या चौकापर्यंत गाडय़ा उभ्या करतात.

*  ‘लेन कटिंग’ सर्रास होते.

*  भ्रमणध्वनीवर गप्पा मारत, भांडण करत गाडय़ा चालविणे सुरू असते.

*  रिक्षाचालक, वाळूच्या मालमोटारचालक बेदरकारपणे वाहने चालवितात. अनपेक्षितपणे मन मानेल तसे ब्रेक लावून थांबतात.

*  महाविद्यालयातील लब्ध प्रतिष्ठितांची मुले-मुली कधी एकटे, डबलसीट तर कधी ट्रिपल सीट बेफान सुटलेले असतात.

*  जड वाहने डावीकडून-हलकी वाहने उजवीकडून हा नियम शहर बससेवेसह सगळ्या मोठय़ा जड वाहनांकडून बरोबर उलटय़ा दिशेने राबविला जातो.

*  महामार्गालगतच्या सव्‍‌र्हिस रस्त्यावर मालमोटार, गॅरेजेस, हातगाडय़ा यांचा विळखा असतो.

*  वाहन पार्किंगचे नियम सगळीकडे धाब्यावर बसविलेले पाहावयास मिळतात.

*  खाद्य विक्रेत्यांच्या गाडय़ा, इतरही व्यवसाय, पेव्हर ब्लॉकचे सुशोभीकरण यामुळे रस्त्यांची रुंदी किमान सहा ते आठ फूट कमी झालेली आढळते.

*  बंगल्यांमध्ये असतात बागा-झोपाळे. गाडय़ा असतात संरक्षक भिंतीच्या बाहेर.वर्तमान वाहतूक-रहदारीच्या  या चित्रात १०० टक्के दोष हा नागरिक, वाहनचालकांचा आहे. नागरिक व वाहनचालकांमध्ये वाढत चाललेल्या बेदकारी वृत्तीचा आहे. या स्थितीत केवळ हेल्मेट सक्ती करून हे चित्र बदलणार आहे का, हा खरा प्रश्न आहे.

पोलीस खात्यातील वाहतूक नियमन विभागाकडून कोण-कोणती कार्यवाही होत असते आणि कशा पद्धतीने होत असते हे सर्वाना ज्ञात आहे. चौकात साधारणत: दोन पोलीस नियुक्त असतात. त्यांचे काय काम चालू असते?

* चौकामधील सोयीच्या ठिकाणी उभे राहून काही जण सावज हेरणे. दंडाच्या तडजोड रकमेची पावती फाडणे अथवा मांडवली करणे, असे करतात.

*  अपघात झाल्यावर गुन्हा दाखल करायची वेळ आलीच तर पोलिसांना जो घटक ‘समजून’ घेईल अथवा पोलिसांवर जो घटक राजकीय अथवा आर्थिक दबाव आणू शकेल, त्यांच्या सोयीने पंचनामा करणे.

* रिक्षावाल्यांसोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांची जपवणूक करणे.

*  मुख्य रस्त्यांवरील दुचाकी टेम्पोत भरून नेणे, नंतर बऱ्याचवेळा तडजोड रकमेची पावती अथवा बिगरपावती तडजोड करून सोडून देणे.

* वरीलपैकी काहीही न करता एकदम शहाण्या माणसासारखे चौकात एका बाजूला उभे राहणे किंवा इकडून-तिकडे फेऱ्या मारत अस्तित्वाचे दर्शन घडविणे.

* प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) कडून वाहन परवाना कसा मिळवितात याच्या कथा फारच रंजक आणि सर्वज्ञात आहेत.

उपरोक्त कामे इंग्रजांच्या काळातील पोलिसांची होती. त्यातील काही तर कोणत्याही सरकारी वा खासगी कार्यालयातील हिशोबनीसाची कामे आहेत. वरीलपैकी एकही काम खऱ्या अर्थाने स्वतंत्र भारतातील पोलिसांसाठी नक्कीच लागू केलेले नाही. शहरातील वाहतूक, रहदारी व्यवस्था अपघातमुक्त, प्राणहानीमुक्त करायची असेल तर नागरिक आणि पोलीस या समाजातील दोन्ही घटकांना आपापले स्वभाव, आपल्या वृत्ती बदलाव्या लागणार आहेत. नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे गांभीर्याने पालन करणे, वाहतुकीचे नियम स्वत:हून पाळणे गरजेचे आहे. दुसऱ्या बाजूने पोलिसांनीही नागरिकांच्या मनातील त्यांच्याबद्दलची दहशतीची भावना नाहीशी होऊन आदराची, विश्वासाची भावना निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

वाहतूक नियम पालन करायला लावण्यासाठी पोलीस संख्याबळ कमी होत असल्यास महाविद्यालयीन विद्यार्थी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांना मदतीला घेतल्यास त्यांच्यातही जबाबदारीची जाणीव निर्माण होईल व पोलीस खात्यावरील भार हलका होऊ शकेल.

[jwplayer 8KwdNmdB]