दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असतांना महिला वर्ग विशेषत: बच्चे कंपनीत खरेदीची धमाल अनुभवण्याची उत्सुकता वाढली आहे. परतीच्या पावसाने या उत्साहावर काहिसे विरजण घातल्याचे चित्र आहे. राजकीय मंडळी व लोकप्रतिनिधी बचत गटांच्या सहकार्याने बंदीस्त सभागृहात ठिकठिकाणी आयोजित आनंद मेळा तसेच हाट बाजारातून ही कसर भरून निघेल, अशी अपेक्षा आहे. या उपक्रमातून राजकीय मंडळींनी जनसंपर्क वाढविणे आणि आगामी निवडणुकांची तयारीवर नजर ठेवल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गेल्या काही वर्षांत बचत गटांनी आपली पापड, मसाले ही नेहमीची चौकट ओलांडत व्यावसायिकता अंगीकारली. सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत विविध पर्यायांवर लक्ष ठेऊन निर्मितीवर भर दिला. बाजारपेठेचा अभ्यास करत ग्राहकांना सर्व काही एकाच छताखाली मिळेल याकडे महिला बचत गटांनी लक्ष केंद्रीत केले. यासाठी मेळावे, हाट बाजार, आनंद मेळा अशा विविध उपक्रमांतून गटाच्या उत्पादनाला तसेच गटाला प्रसिध्दी मिळवण्यासाठी महिला सक्रिय राहिल्या आहेत. दुसरीकडे, लोकप्रतिनिधी असलेल्या नगरसेवक, आमदारांनीही बचत गटाच्या सक्रियतेचा फायदा आपला जनसंपर्क वाढविण्यासाठी तसेच आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी करण्यास सुरूवात केली आहे. निवडणुकीच्या काळात स्त्री शक्तीचे महत्व राजकीय पदाधिकाऱ्यांना ज्ञात आहे. यामुळे अनेक राजकीय मंडळी आपल्या कुटुंबातील महिलांच्या मदतीने बचत गटांतर्गत महिलांचे संघटन करतात. बचत गटातील महिलांना घरगुती स्तरावर काम करण्यासाठी प्रेरित करतांना त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी यासाठी शहरात ठिकठिकाणी बंदीस्त सभागृहात मेळावे भरविण्याची कल्पना पुढे आली. या संकल्पनेला दिवाळीत खऱ्या अर्थाने मूर्त स्वरुप मिळते. नगरसेवक व आमदारांकडून दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर, आपल्या मतदारसंघात व प्रभागात आनंद मेळाव्यासह हाट बाजाराचे आयोजन करण्याची चढाओढ सुरू आहे. नाशिक पश्चिमच्या आ. सीमा हिरे यांच्या समर्थ महिला मंडळाने काही दिवसांपूर्वी दिवाळी महोत्सवाचे आयोजन केले होते. अनेक नगरसेवकांनी या स्वरुपाच्या उपक्रमांसाठी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे.

यामध्ये एका छताखाली कपडे, आकाशकंदील, पणत्या, ड्रेस मटेरियल, इमिटेशन ज्वेलरी, गृहोपयोगी वस्तू, चादरी, बेडशीट, खेळणी, दिवाळीचे फराळ, चटकमटक खाद्य पदार्थ असे अनेक स्टॉल्स लावले जात आहे. यासाठी पालिकेचा मोकळा, समाज मंदिर, बंदीस्त सभागृह किंवा मंगल कार्यालयाची निवड केली जात आहे. यासाठी गटांकडून नाममात्र शुल्क आकारात अर्थकारण, समाजकारण करण्यात लोकप्रतिनिधी सध्या व्यस्त आहेत. अधिक धावपळ न करता माफक दरात घरगुती पदार्थासह अन्य साहित्य एकाच ठिकाणी मिळत असल्याने ग्राहकांचाही मेळावा तसेच हाट बाजाराला प्रतिसाद मिळतो.

भाजप महिला आघाडीतर्फे आजपासून सृजन साधना

भाजप महानगर महिला आघाडी तसेच आर्ट हब यांच्यातर्फे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून १४ व १५ ऑक्टोबर या कालावधीत सृजन साधना प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शरणपूर रस्त्यावरील वैराज कला दालन येथे हे प्रदर्शन होणार आहे. त्यात माजी सैनिक पत्नी, वीरमाता, अंध, मूकबधीर आणि आदिवासी विद्यार्थ्यांची दिवाळीसाठी बनविलेले आकाश कंदील, पणत्या, मेणबत्या, पर्स, साडया, ड्रेस मटेरियल, वेदिका उटणे, ज्वेलरी, गृहसजावटीचे साहित्य तसेच खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी दहा वाजता महापौर महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते तर आ. प्रा. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, शहराध्यक्ष आ.बाळासाहेब सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

लोकप्रतिनिधींनी आयोजिलेल्या मेळाव्यास अधिक प्रतिसाद

वैयक्तिक पातळीवर बचत गटांनी तयार केलेल्या मालास बाजारपेठ मिळवण्यात अडचणी येतात. विक्री वाढविण्यासाठी प्रसिध्दीचे तंत्र आत्मसात असले तरी पैसा आणि वेळ यांचा मेळ बसत नाही. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून भरविण्यात येणाऱ्या मेळाव्याची प्रसिध्दी चांगली होत असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद अधिक असतो. विशेष म्हणजे, सर्वच स्टॉलला कमी-अधिक फरकाने प्रतिसाद सारखा असल्याने कोणीही यामधून नाराज होत नाही.   – श्रृती बेलगांवकर (व्यावसायिक)