युवा पिढीशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधानांचा सहभाग असणारा ‘यंग इंडिया, न्यू इंडिया’ कार्यक्रम थेट प्रक्षेपित करण्याचा फतवा निघाला आणि महाविद्यालयीन स्तरावर संपूर्ण यंत्रणा कामास लागली. या कार्यक्रमासाठी काही महाविद्यालयांना आपल्या परीक्षांच्या वेळापत्रकात ऐन वेळी बदल करावा लागला. गर्दी जमविण्यासाठी तासिका बंद करून मुलांना जबरदस्तीने बसविण्यात आले. शहरात तंत्रज्ञानाच्या आधारे मोठय़ा पडद्यावर पंतप्रधानांना ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली असली तरी ग्रामीण भागात मात्र नेमके उलट चित्र राहिले. स्मार्ट भ्रमणध्वनीवर मोदींचे भाषण ऐकावे लागले, तर काही ठिकाणी आकाशवाणीचा आधार घेण्यात आला. सक्तीने भाषण ऐकण्याच्या पद्धतीविषयी प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

नागरिकांशी विविध माध्यमांतून संवाद साधणाऱ्या पंतप्रधानांनी एकाच वेळी सर्व विद्यापीठांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरिता सोमवारी ‘यंग इंडिया, न्यू इंडिया’ कार्यक्रमाचे आयोजन केले. निमित्त होते, स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत शिकागो येथील जागतिक परिषदेत केलेल्या भाषणाचे. साधारणत: दोन दिवसांपूर्वी या संदर्भात शिक्षण विभागाने महाविद्यालयांना हे भाषण विद्यार्थ्यांसमोर थेट प्रक्षेपित करणे बंधनकारक असल्याचे नमूद केले. त्यासाठी तजवीज करण्यास सांगितले. अकस्मात आलेल्या फतव्याने महाविद्यालय प्रशासनाची धावपळ उडाली. शहरातील काही महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना मोठय़ा पडद्यावर पंतप्रधानांचे भाषण ‘लाइव्ह’ ऐकण्याची अनुभूती मिळाली. या भाषणाच्या वेळेत काही विभागांत अंतर्गत परीक्षा होत्या. भाषण ऐकणे बंधनकारक असल्याने त्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले. काही महाविद्यालयांमध्ये नॅक कमिटी आली आहे.

त्या समितीचे आदरातिथ्यासह अन्य कामे करत हा कार्यक्रम एका बंद खोलीत काही मोजक्याच विद्यार्थ्यांना दाखविला गेला. या संदर्भात सागर शेलार याने वर्ग सुरू असताना अचानक तो बंद करत मुलांना सभागृहात नेण्यात आल्याचे सांगितले. त्या ठिकाणी पंतप्रधानांचे भाषण सुरू झाले होते. आधी कोणतीही पूर्वसूचना दिली गेली नाही.

वास्तविक पुढच्या आठवडय़ात परीक्षा सुरू होत आहे. त्या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण नसल्याने जादा तासिकेवर आमची भिस्त असताना हातात असलेला वेळ वाया गेला, अशी प्रतिक्रिया त्याने दिली. सक्तीने भाषण ऐकण्याच्या प्रकाराबद्दल प्राध्यापक व अनेक विद्यार्थ्यांनी नाराजी प्रगट केली. काही विद्यार्थ्यांनी मात्र त्याचे स्वागत केले.

ग्रामीण भागात यापेक्षा वेगळे चित्र होते. शुक्रवारी सायंकाळी महाविद्यालयांना या कार्यक्रमाची माहिती मिळाली. शनिवारी विद्यार्थ्यांची संख्या कमी, तर रविवारी सुटी असल्याने या उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविता आली नाही. दुसरीकडे, त्यासाठी अपेक्षित यंत्रणा उभारण्यास वेळ न मिळाल्याने वेगवेगळे पर्याय शोधण्यात आले. येवला येथील मुक्तानंद महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी ‘प्रोजेक्टर’ किंवा मोठा पडदा उभा करण्यास वेळ मिळाला नसल्याचे नमूद केले. त्यामुळे वर्गात चार ते पाच मुला-मुलींचे वेगवेगळे गट तयार करत त्यांच्याकडील भ्रमणध्वनीवर पंतप्रधानांचे भाषण ऐकण्यात आले. काही ठिकाणी रेडिओद्वारे पंतप्रधानांचे भाषण ऐकण्यात आले. भाषण ऐकण्याच्या सक्तीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.