निवडणूक  जिल्हा परिषद, पंचायत समिती

आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिल्या जाणाऱ्या मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीत प्रदीर्घ काळापासून सत्ता राखणारी राष्ट्रवादी काँग्रेस वर्चस्व कायम ठेवण्यात यशस्वी होणार की स्वतंत्रपणे लढणाऱ्या शिवसेना अथवा भाजपची सरशी होणार, याचे उत्तर अवघ्या काही तासात समोर येणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत यंदा ६९ टक्के मतदान झाले आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानात ६.८० टक्क्यांनी वाढ झाली असून त्याचा लाभ कोणाला होईल, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

पक्ष स्थापनेपासून नाशिक जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँँग्रेसचे वर्चस्व आहे. जिल्ह्यतील एकखांबी नेतृत्व असणारे छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीत ही निवडणूक पार पडली.

या पक्षाचे इतर काही वरिष्ठ नेते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. सत्ता कायम राखण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर आहे. दुसरीकडे शिवसेना व भाजपने राज्यातील सत्ताकेंद्राचा वापर करत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली.

काही तालुक्यात काँग्रेसने राष्ट्रवादीशी आघाडी केली तर काही तालुक्यात दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले. या एकंदर स्थितीत मतपेटीतून काय निकाल बाहेर येईल याबद्दल सर्वच पक्षांमध्ये उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी ३३८ तर पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी ६७६ या उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला मतमोजणीद्वारे होईल.

या निवडणुकीचे वैशिष्ठय़ म्हणजे मतदानाची वाढलेली टक्केवारी महापालिका व जिल्हा परिषदेसाठी यंदा एकाच वेळी मतदान झाले. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात मतदारांनी मतदानात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. २०१२ मधील निवडणुकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी ६२.२० टक्के मतदान झाले होते. यंदा त्यात ६.८० टक्क्यांनी वाढ होऊन ते ६९ टक्क्यांवर पोहोचले. सर्वाधिक म्हणजे ७६.५७ टक्के पेठमध्ये तर सर्वात कमी ६२.७० टक्के मतदान बागलाण तालुक्यात झाले. उर्वरित मालेगाव तालुक्यात ६५.५३ ,देवळा ६७.३३, कळवण ७२.३३, सुरगाणा ६९.६६, दिंडोरी ७३.८१, चांदवड ६८, नांदगाव ६३.४२, येवला ७२.५०, निफाड ७०.१६, नाशिक ७०.३१, त्र्यंबकेश्वर ७३.७३, इगतपुरी ६९.८२ आणि सिन्नर तालुक्यात ६८.२५ टक्के मतदान झाले.

जिल्ह्यतील २४ लाख २६ हजार ७३५ पैकी १६ लाख ७४ हजार ५०५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

मतमोजणी केंद्रे

वेगवेगळ्या ठिकाणी गट व गणनिहाय मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी दिली. पठावेदिगर, ताहारबाद जायखेडा, नामपूर, विरगाव, ठेंगाडा, ब्राम्हणगाव गटाची मतमोजणी सटाणा येथील तहसीलदार कार्यालयातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात होणार आहे. वडणेर, झोडगे, कळवाडी, रावळगाव, दाभाडी, निमगाव, सौंदाणे गटाची मतमोजणी मालेगावच्या संगमेश्वर येथील शिवाजी जिमखाना तर लोहणेर, उमराणे व वाखारी गटाची देवळा तहसीलदार कार्यालयातील नव्या प्रशासकीय इमारतीत होईल. खर्डेदिगर, मानुर, कनाशी, अभोणा गटाची कळवण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयालगतचे सभागृह, गोंदूणे, हट्टी, भवाडा गटाचे सुरगाणा तहसील कार्यालय, धोंडमाळ, कोहोर गटाची पेठ येथील तालुका क्रीडा संकुल, अहिवंतवाडी, कसबेवणी, खेडगाव, कोचरगांव, उमराळे बुद्रुक व मोहाडी गटाची दिंडोरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दुगाव, तळेगावरोही, वडाळी भोई व वडनेर भैरव गट चांदवड येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, साकोरा, न्याय डोंगरी, भालूर व जातेगाव गटाची नांदगाव तहसीलदार कार्यालय, पाटोदा, नगरसूल, राजापूर, अंदरसुल व मुखेडची येवला तालुका क्रीडा संकुल, पिंपळगाव बसवंत, पालखेड, लासलगाव, विंचूर, उगाव, कसबे सुकेणे, ओझर, चांदोरी, सायखेडा, देवगावचे निफाड येथील कर्मवीर गणपतदादा महाविद्यालय, गिरणारे, पळसे, एकलहरे व गोवर्धन गटाची नाशिक शहरातील पंचायत समिती सभागृह, ठाणापाडा, हरसूल व अंजनेरी गटाची त्र्यंबकेश्वर तहसीलदार कार्यालय, शिरसाटे, वाडीवऱ्हे, घोटी बुद्रुक, नांदगाव सदो, खेडची इगतपुरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि नायगाव, मुसळगाव, देवपूर, नांदुरशिंगोटे, चास व ठाणगाव गटाची मतमोजणी सिन्नरच्या जीएमडी महाविद्यालयाच्या जिमखान्यात होणार आहे.