राकेश सोनारविरुद्ध नाशिकमध्ये अनेक गुन्ह्य़ांची नोंद
नाशिकचा कुख्यात गुंड राकेश सोनार (२३) यास बुधवारी पहाटे येथील चाळीसगाव चौफुलीवर अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुले हस्तगत करण्यात आली आहेत. अनेक गुन्ह्य़ांत सामील असलेला सोनार धुळ्यात पिस्तुले घेऊन आल्याने तो मोठय़ा गुन्ह्य़ाच्या प्रयत्नात होता काय, यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला असल्याची माहिती अधीक्षक साहेबराव पाटील यांनी दिली.२०१२ मध्ये धुळ्यातील डॉ. बोर्डे यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आला होता. या दरोडय़ात राकेश सोनार याचा हात असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. सोनार बुधवारी धुळ्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. पहाटे तीनच्या सुमारास पुण्याकडून आलेल्या लक्झरी बसमधून संशयित उतरताच त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. आपण नाशिक येथील अंबड लिंक रोडवरील पाटील पार्कमध्ये राहत असून सध्या पुण्यातील दापोडी येथे मुक्काम असल्याचे त्याने सांगितले. त्याची तपासणी केली असता कमरेला दोन गावठी पिस्तुले आढळून आली. ती ताब्यात घेत पोलिसांनी सोनारला अटक केली. त्याच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राकेश सोनार हा नाशिक शहरातील कुख्यात गुंड असल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षकांनी दिली. त्याच्यावर सातपूर, भद्रकाली, अंबड, नाशिकरोड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्य़ांची नोंद आहे. नाशिकमधील गँगवारमध्येही तो सक्रिय असतो, अशी माहितीही पाटील यांनी दिली.