तीस प्रजातींच्या शेकडो पक्ष्यांचा किलबिलाट

‘चिव चिव चिमणी पिते पाणी..’, ‘पोपटा पोपटा बोलतोस गोड.’, ‘चिऊताई चिऊताई दार उघड’.. एरवी बालगीतात हरवलेल्या या शब्दांची प्रत्यक्ष अनुभूती उन्हाळी सुटीत बालगोपाळांना मिळत आहे. नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे आयोजित पक्ष्यांच्या शाळेत पक्ष्यांसोबत बच्चे कंपनीचीही गर्दी होत आहे. जागतिक पर्यावरण दिनी ही शाळा सर्वांना पाहाण्यासाठी खुली करण्यात येणार आहे.

गेल्या तीन वर्षांपासून नेचर क्लबने ‘पक्ष्यांची शाळा’ हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. उन्हाळ्यात पक्ष्यांना दाणा-पाण्याची सोय व्हावी, विद्यार्थ्यांंना पक्ष्यांची ओळख व्हावी, नदी काठावरील पक्ष्यांची निरीक्षणे करून पक्षी संवर्धनार्थ काय करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी पक्ष्यांची शाळा हा उपक्रम राबविला जातो. यंदा संत गाडगे महाराज धर्मशाळेत हे वर्ग भरले आहेत. संस्थेचे कार्यकर्ते तीन महिन्यापासून शाळा चालवत असून आतापर्यंत शाळेत ३० प्रजातीच्या शेकडो पक्ष्यांनी किलबिलाट केला आहे. शाळेसाठी ‘टाकाऊ तून टिकाऊ ’ या संकल्पनेवर साहित्य तयार केले जात आहे.

प्लास्टिक बाटल्यातून पक्ष्यांना पाणी आणि खाद्य ठेवण्यासाठी उपकरणे संस्थेने स्वत: बनविली. वसई किल्ल्यावर श्रमदान मोहीम राबविताना पर्यटकांनी फेकलेल्या बाटल्या गोळा करून त्याचा उपयोग केला तसेच योगेश कापसे, संपदा पाटील यांनीदेखील बाटल्या उपलब्ध करून दिल्या. गाडीच्या खराब टायरचा उपयोग करून परिसरात पाच तळी बनविण्यात आली. नारळाच्या करवंटीतून खाद्य देणारी वाटी तयार करण्यात आली. तेलाच्या डब्याचा उपयोग करून फूडर बनविण्यात आले तसेच लाकडाची दहा घरटीदेखील लावण्यात आली.

शाळेतील या व्यवस्थेची पक्ष्यांना भुरळ पडली आहे. सध्या शाळेत चिमण्या, बुलबुल, सनबर्ड, स्विफ्ट, हेरॉन, नाईट हेरॉन, कार्मारंट, साळुंक्या, दयाळ, शिंपी, धोबी, कावळे, भारद्वाज, कोकिळा, तांबट आदींसह अनेक पक्ष्यांचा किलबिलाट ऐकण्यास  मिळत आहे. या शाळेला नुकतीच रशियन पर्यटकांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.

[jwplayer 9RpbYVxO]

शाळेतल्या पक्ष्यांच्या चिवचिवाटाची साद मिळाल्याने चित्रकार योगेश रोकडे, महेश जगताप, अनुपमा चव्हाण व प्रीतम महाजन यांनी शाळेच्या आवारात पक्ष्यांची चित्रेदेखील रेखाटली आहेत. पक्ष्यांची अनोखी शाळा जागतिक पर्यावरण दिनी अर्थात ५ जून रोजी सर्वाना बघता येणार असून या ठिकाणी छायाचित्र प्रदर्शनदेखील भरविले जाणार आहे. नागरिकांनी पर्यावरणाचे धडे गिरवावे, यासाठी टाकाऊतून टिकाऊ  फु डर कसे बनवायचे, याची प्रात्यक्षिकासह माहिती दिली जाणार आहे. या उपक्रमास गाडगे महाराज धर्मशाळेचे व्यवस्थापक कुणाल देशमुख यांचे सहकार्य मिळाले असून शाळा चालविण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, भीमराव राजोळे, अप्पा कोरडे, सागर बनकर, आकाश जाधव, आशीष बनकर, धनंजय बागड आदी परिश्रम घेत आहेत.