शासकीय रुग्णालयातील २५०हून अधिक सुविधांच्या शुल्कातील दरवाढ त्वरित मागे घ्यावी, या मागणीसाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्राहक संरक्षण समितीच्या वतीने संदर्भ सेवा रुग्णालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. आपल्या मागण्यांचे निवेदन आंदोलकांनी आरोग्य उपसंचालकांना दिले.
महागाईमुळे सर्वसामान्य अडचणीत सापडले असताना राज्य दुष्काळाच्या सावटाखाली आहे. त्यातच शासनाने शासकीय रुग्णालयातील रुग्ण शुल्कात वाढ करून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली आहे. खासगी रुग्णालयाप्रमाणे शासकीय रुग्ण सेवाही महाग झाली आहे.
केस पेपर, रक्त व लघवी चाचणी, सोनोग्राफी, सीटी स्कॅन यांसारख्या २५०हून अधिक सुविधांच्या शुल्कात आरोग्य खात्याने मोठी वाढ केली. तसेच एआरव्ही, वैद्यकीय प्रमाणपत्रे, रुग्णवाहिका, काही महत्त्वाच्या लसी ज्या आजपर्यंत नि:शुल्क उपलब्ध होत्या, त्यासाठी नागरिकांना आता पैसे मोजावे लागणार आहेत.
या दरवाढीचा निषेध ग्राहक संरक्षण समितीचे संपर्कप्रमुख अ‍ॅड. सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी केला. आरोग्य विभागाने केलेली अन्यायकारक दरवाढ त्वरित मागे घ्यावी, शासकीय रुग्णालयात मोफत मिळणाऱ्या सुविधा पूर्ववत कराव्यात, शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक सर्व लसी व औषधे उपलब्ध करावीत, संदर्भ सेवा रुग्णालयात सिकलसेल, थॅलिसेमिया, हिमोफेलिया यासारख्या गंभीर व महागडय़ा आजारांवर उपचार सुरू करावेत या मागण्या निवेदनात करण्यात आल्या.
तसेच सिंहस्थासाठी उभारलेल्या इमारतीत रुग्ण सेवा सुरू करावी, लहान मुलांसाठी विशेष कक्ष कार्यान्वित करावा, शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खासगी प्रॅक्टिसवर बंदी घालावी, शासकीय रुग्णालयातील विविध उपकरणे कार्यान्वित करावीत, याकडे आंदोलकांनी लक्ष वेधले.