जननी सुरक्षा व हक्क जागृती अभियान तसेच स्त्रीभ्रूण हत्येमुळे चर्चेत असलेल्या डॉ. वर्षां लहाडे यांना अटक करत त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनानंतर महिला आंदोलकांनी पोलीस आयुक्तांची भेट घेत दोषींवर कारवाईची मागणी केली.

जिल्हा शासकीय रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. लहाडे यांनी केलेले अवैध गर्भपात तसेच स्त्रीभ्रूण हत्या प्रकरण राज्यात गाजत आहे. या घटनेच्या निषेधार्थ वैद्यकीय संघटना आणि सामाजिक संस्था रस्त्यावर उतरले. राजकीय पक्षांनी यापासून दर राहणे पसंत केले.

मागील आठवडय़ात खा. सुप्रिया सुळे नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांनी जिल्हा रुग्णालयातील अवैध गर्भपात प्रकरणातील दोषींना अटक करून कारवाईची मागणी केली होती. ही कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. सोमवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, डॉ. भारती पवार, अनिता भामरे आदीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनात राज्यात मुलींचे घटते प्रमाण तसेच गर्भलिंग निदान कायद्याचे होणारे उल्लंघन याकडे लक्ष वेधले. हे प्रकार रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर गर्भलिंग निदान कायदा हत्याविरोधी कायदा समिती गठित करावी, त्यांच्या नियमित बैठका घ्याव्यात, गर्भपाताकरिता लागणारी औषधे ही डॉक्टरांच्या चिठ्ठीनुसार उपलब्ध व्हावी, गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘मिसोप्रोस्टोल’ औषधांच्या विक्रीकडे त्यांनी लक्ष वेधले. गर्भपात कायदा, गर्भलिंग निदान कायदा आणि औषध नियंत्रण कायदा हे तीनही कायदे वेगवेगळ्या विभागाकडून हाताळले जात असल्याने तीनही यंत्रणा एकाच छताखाली आणून सुसूत्र पद्धतीने काम करतील, अशी व्यवस्था करावी असाही मुद्दा मांडण्यात आला.

प्रसूतीनंतर नवजात अर्भकासाठी सरकारी रुग्णालयात विशेष कक्षाची उपलब्धता, गर्भलिंग निदानासाठी मदर चाइल्ड ट्रेकिंग सिस्टीम राज्यात सर्वत्र लागू करणे, जननी सुरक्षाअंतर्गत सहा हजार रुपये अनुदान जाहीर करून ते संबंधितांना दिले जावे, आदी मागण्या करण्यात आल्या. डॉ. लहाडे यांना त्वरीत अटक करीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर याबाबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणाबाबत पोलीस आयुक्तांनाही निवेदन देण्यात आले.