डॉ. वासुदेव गाडे, विजयश्री चुंबळे यांच्या उपस्थितीत वितरण

येथील नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंडच्या वतीने देण्यात येणारे अंध शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार जाहीर झाले आहेत. आदर्श प्राध्यापक विशेष पुरस्कारासाठी मुंबईच्या के. जे. सोमय्या अध्यापक विद्यालयाच्या अंध प्राचार्य डॉ. कल्पना खराडे यांची निवड करण्यात आली. या पुरस्कारांचे वितरण ४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजयश्री चुंबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

याबाबतची माहिती नॅबचे अध्यक्ष मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. सातपूर येथील नाइस सभागृहात हा कार्यक्रम होईल. राज्य शासनाचे अंध-अपंग क्षेत्रात काम करणारे शिक्षक, गुणवंत विद्यार्थी यांच्याकडे काहीअंशी दुर्लक्ष झाले आहे. अंध-अपंग क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी नॅब या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करते. यंदा प्रा. खराडे यांच्यासह अन्य गुणवंताचा सन्मान करण्यात येणार आहे. आदर्श शिक्षक पुरस्काराने अंध शिक्षक नथ्थुसिंग पाटील (बुलढाणा) व विनोद कांबळे (अहमदनगर), डोळस शिक्षक चंद्रकांत गोंधळी (सोलापूर), भारती चाभारेकर (पुणे) यांना सन्मानित करण्यात येणार आहे. आदर्श संस्था पुरस्कारासाठी ठाणे येथील प्रगती विद्यालयाची निवड करण्यात आली. विशेष सेवा पुरस्कार अहमदनगर येथील नॅबच्या सेविका उज्ज्वला भाट यांना, तर कोईमतूर येथील रामकृष्ण मिशन विवेकानंद विद्यापीठात ‘डेफब्लाइंड’ विषयात पीएचडी करणाऱ्या एकमेव पहिल्या भारतीय विद्यार्थी डॉ. श्रुती बोबडे, मुंबई विद्यापीठातील शबाना सदाफ इरफान खान, पुणे विद्यापीठाच्या प्रवीण बडे, अहमदनगर येथील ज्योती तावळे, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सीमा गायकर, उच्च माध्यमिक स्तरावर भुसावळ येथील भोळे महाविद्यालयाचा श्रीकुंड देशमुख, के. जे. मेहता हायस्कूल आणि ई. वाय पाडोळ कनिष्ठ महाविद्यालयाचा शुभम महाजन, मातोश्री सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालयाची नेहा चौधरी यांच्यासह १२ विद्यार्थी, माध्यमिक विद्यालय स्तरावर धुळे येथील पटेल कन्या मराठी विद्यालयाची प्राची अग्रवाल, नाशिक येथील आदर्श विद्यालयाचा वेदांत मुंदडा व आकाश चव्हाण, शासकीय कन्या विद्यालयाच्या अर्चना आगळे यांच्यासह नऊ जणांना सन्मानित करण्यात येणार आहे. रोख रक्कम, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

शासनाने पुरस्कारप्राप्त शिक्षक व प्राध्यापक यांना शासकीय आदर्श शिक्षक पुरस्काराप्रमाणे शासकीय सवलती, वेतनवाढीचा विचार करावा, अशी मागणी मुनशेट्टीवार यांनी केली. पुरस्कार निवड समितीत डॉ.  प्रा. भास्कर गिरीधारी, डॉ. प्रा. सिंधु काकडे, प्रा. विजयकुमार पाईकराव, राजेश उपासनी यांच्यासह मुनशेट्टीवार, रामेश्वर कलंत्री, गोपी मयूर यांनी काम पाहिले.